गर्भवती महिलांच्या आरोग्याची काळजी ही कुटुंबाची सामूहिक जबाबदारी - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:09 AM2021-09-07T04:09:02+5:302021-09-07T04:09:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गर्भवती महिलेच्या आरोग्याची जबाबदारी ही केवळ महिलांची जबाबदारी न राहता संपूर्ण कुटुंबाची, समाजाची जबाबदारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गर्भवती महिलेच्या आरोग्याची जबाबदारी ही केवळ महिलांची जबाबदारी न राहता संपूर्ण कुटुंबाची, समाजाची जबाबदारी व्हायला हवी. आपल्या परिसरातील एखादी गर्भवती महिला, एखादे कुपोषित बालक असेल तर त्यांना मदत करण्याची जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःची मानली पाहिजे, असे आवाहन केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी केले.
केंद्र सरकारच्या पोषण अभियानाअंतर्गत सप्टेंबरचा महिना हा पोषण महिना म्हणून साजरा केला जात आहे. यानिमित्त सोमवारी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी आणि केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी सोमवारी मुंबईत आयोजित विविध कार्यक्रमांत सहभागी झाले. दिवसभर झालेल्या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी विविध धार्मिक समुदायांशी संवाद साधला. वांद्रे येथील अंजुमन-ई-इस्लाम कन्या शाळा येथे मुस्लीम समुदायाशी, तर महात्मा गांधी सेवा मंडळ येथे जैन, शीख आणि बौद्ध समुदायांशी तसेच सायनच्या अवर लेडी उच्च माध्यमिक शाळेत ख्रिस्ती समुदायाशी तसेच दादर येथील दादर अथोर्नन संस्थेत पार्झर फाऊंडेशन येथे पारशी समुदायाशी संवाद साधला. यावेळी गरजू महिला आणि कुपोषित बालकांना पोषण किट्सचे वाटप यावेळी करण्यात आले.
महिलांच्या समस्या आता मुख्य प्रवाहाचा भाग आहेत. महिलांच्या समस्यांना पंतप्रधानांनी सामाजिक समस्येचे व्यापक रूप दिल्याचे सांगून स्मृती इराणी म्हणाल्या की, पोषण अभियान हे केवळ महिला आणि बालविकास मंत्रालयाचे अभियान नसून हे समग्र सामाजिक अभियान आहे. कोरोनाकाळातही तब्बल १३ कोटी उपक्रम राबविण्यात आले. यात आणखी वाढ केली जाणार आहे. अंगणवाडीतील मुलांच्या पोषणाचे कोणतेच मोजमाप नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता देशभरातील दहा लाख अंगणवाड्यांना विकास परीक्षण उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. प्रत्येक लाभार्थ्याची नोंद ठेवण्यासाठी मोबाइलवर आधारित ट्रॅकींग प्रणाली सुरू केली. सध्या नऊ कोटी लहान मुले, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या पोषण कार्यक्रमाचा, दर्जाचे ट्रॅकींग सुरू असल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितले. पंतप्रधान मातृ वंदना योजनेद्वारे केंद्र सरकार गर्भवती महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा करत आहे. यातून लस, आहार इत्यादींची काळजी घेणे अधिक सुलभ झाले आहे. मागील तीन वर्षांत दोन कोटी गर्भवती महिलांच्या बँक खात्यांत केंद्र सरकारने ८ हजार ८०० कोटींहून अधिकची रक्कम जमा केल्याचे इराणी यांनी सांगितले.
आपल्या परिसरातील एखादी गर्भवती महिला, एखादे कुपोषित बालक असेल तर त्यांना मदत करण्याची जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःची मानली पाहिजे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सर्वांनी स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण करू तेव्हा एकही कुपोषित मूल असणार नाही, अशी शपथ घेण्याचे आवाहन इराणी यांनी विविध समुदायातील व्यक्तींना यावेळी केले.