Join us

कंटेनरमध्ये उभारले आरोग्य केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई- प्रभाग क्रमांक २०६ मधील शिवडी पूर्व येथे गेल्या ४० वर्षांपासून मनपाचे अधिकृत दवाखाने आरोग्य केंद्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई- प्रभाग क्रमांक २०६ मधील शिवडी पूर्व येथे गेल्या ४० वर्षांपासून मनपाचे अधिकृत दवाखाने आरोग्य केंद्र नव्हते. तेथील नागरिकांना २ किमी एवढा अंतर गाठून केईम तसेच शिवडी नाका येथील आरोग्य केंद्रात यावे लागायचे. तसेच कोरोनासारख्या काळात या विभागात नागरिकांचे खूप हाल झाले होते. एखादा चांगला बी.एम.एस.डाॅक्टरदेखील या विभागात नव्हता. मात्र आता तब्बल ४० वर्षांनी शिवडीवासीयांना हक्काचे रुग्णालय मिळाले आहे.

नगरसेवक सचिन पडवळ यांनी शिवडी पूर्व विभागात आरोग्य केंद्र उभारण्यात यावे, असा प्रस्ताव मुंबई मनपाला दिला होता. त्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली त्यानंतर मनपा अधिकारी वर्ग यांच्यासोबत बैठक झाली आणि कित्येकदा पाहणीदेखील झाली. भाड्याने जागा घेऊन हजारो रुपये भाडे भरणे आणि मग त्यावर होणाऱ्या डागडुजीवरचा खर्च वाचवण्यासाठी कंटेनरमध्ये सदर सुसज्ज आरोग्य केंद्र उभारल्याची माहिती नगरसेवक पडवळ यांनी दिली.

सदर ठिकाणी शिवडी कोळीवाडा येथे श्री बाळासाहेब ठाकरे दवाखाना आरोग्य केंद्राचे आज लोकार्पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याहस्ते करण्यात आले. येथील सुमारे ३५०० नागरिकांना या आरोग्य केंद्राचा लाभ होणार आहे. सदर आरोग्य केंद्रात ४ एसी कंटेनर असलेला दवाखाना एम.बी.बी.एस. डाॅक्टर, कम्पाउंडर आरोग्य सेविका इतर कर्मचारी आदी सुविधा आहेत.

तसेच येथे मनपा शेड्यूलवर असलेली मोफत औषधे, ओ.पी.डी. व रक्त तपासणी, मोफत समुपदेशन,लहान मुलांचे लसीकरण (० ते ५ वय) आदी सुविधादेखील उपलब्ध आहेत.

सदर आरोग्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे, आमदार अजय चौधरी ,नगरसेवक सचिन पडवळ, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डाॅ. मंगला गोमारे, आदी मान्यवर उपस्थित होते.