सर्व निवासी इमारतींमधील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आवश्यक, पालिकेची सुधारित नियमावली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 08:48 PM2020-10-01T20:48:01+5:302020-10-01T20:48:30+5:30
यापुढे सुरक्षारक्षक, सफाई कामगार, वाहन चालक या सर्वांची आरोग्य तपासणी करून घेणे महापालिकेने सर्व निवासी इमारतींना बंधनकारक केले आहे.
मुंबई - लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अनेक इमारतींमध्ये घरकाम करणारे, वाहनचालक आदींना प्रवेश दिला आहे. मात्र उत्तुंग इमारतींमध्ये बाधित रुग्णांचे प्रमाणही आता वाढत असल्याने यापुढे सुरक्षारक्षक, सफाई कामगार, वाहन चालक या सर्वांची आरोग्य तपासणी करून घेणे महापालिकेने सर्व निवासी इमारतींना बंधनकारक केले आहे.
मुंबईतील चाळी व झोपडपट्ट्यांमधील बाधित क्षेत्रांचे प्रमाण कमी होत असताना इमारती सील होण्याचे प्रमाण वाढले आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या विभागांमध्ये तसेच मलबार हिल, ग्रँड रोड, पेडर रोड येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. तरीही तूर्तास दहापेक्षा अधिक रुग्ण अथवा दोनहून अधिक मजल्यांवर बाधित रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील करण्याचा नियम महापालिकेने कायम ठेवला आहे. याबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सुधारित नियमावली जाहीर केली आहे.
मात्र यापुढे निवासी इमारतींमध्ये वाहनचालक, वॉचमन, सफाई कामगार यांना घेण्यापूर्वी त्यांची आरोग्य चाचणी करून घेणे आवश्यक असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. महापालिकेने अनेक विभागांमध्ये फिरते दवाखाने सुरू केले आहेत, तिथे या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यात कोरोनाची लक्षणे नाहीत, याची खातरजमा करता येईल. यासाठी निवासी इमारतींच्या पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घ्यावी, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
चाचणीचे प्रमाण वाढविणार...
मुंबईत सध्या दररोज सुमारे १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. यामध्ये आर.टी.पी. सी. आर आणि अँटीजन चाचणीचाही समावेश आहे. त्याचबरोबर पालिकेची मोबाईल व्हॅनही प्रत्येक परिमंडळात फिरून बाधित रुग्णांना शोधत आहे. मात्र येत्या काही दिवसांमध्ये चाचणीचे प्रमाण वाढवून १८ हजार ते २० हजार पर्यंत नेण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. त्यानुसार सर्व सहाय्यक आयुक्तांना नियोजन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.