आरोग्य समिती अध्यक्षांनी दिली नेस्को कोविड केंद्राला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:07 AM2021-05-10T04:07:05+5:302021-05-10T04:07:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गोरेगाव येथील नेस्को कोविड केंद्राला मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समिती अध्यक्ष राजुल पटेल यांनी नुकतीच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगाव येथील नेस्को कोविड केंद्राला मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समिती अध्यक्ष राजुल पटेल यांनी नुकतीच भेट देऊन येथील आरोग्य आणि लसीकरण यंत्रणेची पाहणी केली. यावेळी वर्सोवा विधानसभेचे शिवसेनेचे उपविभागप्रमुख राजेश शेट्ये उपस्थित होते.
नेस्को कोविड केंद्राच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्रादे यांनी आरोग्य समिती अध्यक्षांना कोविड सेंटरची माहिती दिली. आजपर्यंत या केंद्रात २०.००० कोविड रुग्ण दाखल झाले, या केंद्रातील कंट्रोल रूममध्ये बसून केंद्राची रुग्ण दाखल करून घेण्यापासून ते डिस्चार्ज देईपर्यंतची यंत्रणा कशी चालते, याची सविस्तर माहिती राजुल पटेल यांनी करून घेतली.
कोविड रुग्ण येथे दाखल होतानाच त्यांना दररोज लागणारे स्वच्छता साहित्य किट, चादर आदी देण्यात येते. या सेंटरमध्ये प्रत्येक रुग्णाचे जेवण कसे नियंत्रित केले जाते, तसेच स्वत: येथील रुग्णांच्या सोयीसाठी सीएसआर फंडातून आरोग्य सामग्री प्राप्त कशी केली, याची माहितीही डॉ. नीलम अंद्रादे यांनी त्यांना दिली. आयसीयू केंद्रातील सुविधा, महिला कक्ष, रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णांसाठी पाठवलेल्या वस्तू काेराेना नियमांचे पालन करत रुग्णांपर्यंत कशा पोहचवल्या जातात याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही त्यांनी आरोग्य समिती अध्यक्षांना दाखवले.
काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी उद्घाटन केलेल्या ८०० बेड्सच्या अतिरिक्त कक्षाची व एक-दोन दिवसांतच सुरू होणाऱ्या या कक्षासोबत १० नवीन व्हेंटिलेटरर्स बेड वाढवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी आरोग्य समिती अध्यक्षांना दिली.
या कोविड केंद्रासाेबत सिटीस्कॅनची सुविधा असलेला कक्षही येत्या काही दिवसांत अद्ययावत करून रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्याचा मानसही डॉ. अंद्रादे यांनी व्यक्त केला. रुग्णांच्या वैयक्तिक वस्तू सुरक्षित राहाव्या म्हणून या केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतले, तसेच रुग्ण दाखल होण्यापूर्वी त्यांच्या जवळील वस्तू नातेवाइकांकडे सोपवून दाखल करून घेण्याच्या सूचना सुरक्षारक्षकांना दिल्या आहेत असे त्यांनी सांगितले.
या कोविड केेंद्रासोबत नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारीही व्यवस्थित पार पाडली जात आहे. लसीकरण कक्षात दररोज सुमारे ६,००० जणांचे लसीकरण होण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी येणाऱ्या नागरिकांना बिस्किटे, ताक, पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.
या सर्व सुविधा नेस्को केंद्राद्वारे कोविड रुग्णांना व लसीकरण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उपलब्ध हाेत आहेत, हे पाहून आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांनी डॉ. नीलम अंद्रादे यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.
-- - - -- - ---- ------------------------------