मुंबई : पालिका रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा करण्यासाठी पालिकेने निविदा काढली होती. मात्र, औषध विक्रेत्यांचे २० टक्के पैसे अद्यापही पालिकेने न दिल्याने बहुतांश कंपन्यांनी त्याकडे पाठ फिरवल्याचा आरोप काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे हजारो कोटींचा निधी असूनही पालिका या कंपन्यांचे पैसे का देत नाही, असा प्रश्नही या लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला.
पालिकेच्या रुग्णालयांच्या या बिकट अवस्थेबद्दल अश्रफ आझमी, सुफियान वणू, मोहसीन हैदर, आसीफ झकेरिया, विरेंद्र चौधरी, शीतल म्हात्रे, अजंठा यादव यांच्यासह काँग्रेसच्या इतर माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत ताशेरे ओढले. मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत पालिकेचा ढिसाळ कारभारावर टीका करत चव्हाट्यावर आणला.
सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्याच्या नावाखाली एकीकडे मुंबई पालिका प्री-स्क्रिप्शनलेस धोरण लागू करत असताना दुसऱ्या बाजूला पालिकेच्या ज्या रुग्णालयांमध्ये हे धोरण राबविले जाणार आहे, ती रुग्णालयेच अत्यवस्थ असल्याचा आरोपही हाेत आहे. पालिकेच्या अखत्यारीतील रुग्णालयांत वैद्यकीय साहित्य, जीवनरक्षक औषधे, दूध आणि अन्नपुरवठा यांच्या निविदा प्रक्रिया प्रशासकांच्या ढिलाईमुळे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहेत. याचा फटका लाखो मुंबईकरांना बसत असल्याची टीकाही त्यांनी केली.
रुग्णांना बसतोय फटका:
गेल्या एका वर्षात केंद्रीय खरेदी प्राधिकरणात जवळपास कोणत्याही औषधाचे वेळापत्रक निश्चित झालेले नाही. रुग्णालय सुरू ठेवण्यासाठी डीन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना, रुग्णाला लागणारी महत्त्वाची औषधे रोजच्या रोज खुल्या बाजारातून जास्त दराने खरेदी कराव्या लागतात. तसेच रुग्णालयात होणारा दुधाचा पुरवठा, अन्नपदार्थांची खरेदी रुग्णालय स्तरावर होत असल्याने प्रत्येक रुग्णालय वेगवेगळा दर आणि अटींवर समान वस्तू खरेदी करीत आहेत, ही खरेदी चढ्या दराने होत असल्याने त्याचा फटका रुग्णांना बसत असल्याचा आरोप या माजी नगरसेवकांनी केला.