आपत्कालीन स्थितीसाठी आरोग्य विभागाचे नियोजन आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:06 AM2021-01-23T04:06:17+5:302021-01-23T04:06:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - कोरोना विषाणूचे आव्हान, साथीचे आजार यांची वारंवारता लक्षात घेऊन भविष्यात आपत्कालीन स्थितीसाठी आरोग्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोरोना विषाणूचे आव्हान, साथीचे आजार यांची वारंवारता लक्षात घेऊन भविष्यात आपत्कालीन स्थितीसाठी आरोग्य विभाग तयार ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आतापासूनच नियोजन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी शुक्रवारी केले. भविष्यात आपल्याला तयारी व नियोजनाला फार वेळ मिळणार नाही. त्यामुळे तत्काळ प्रतिसाद देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
सेंट गो. सू. वैद्यकीय महाविद्यालय व रा. ए. स्मा रुग्णालयाचा ९५ वा वर्धापन दिन समारंभ केईएम रुग्णालयाच्या जीवराज मेहता सभागृहात पार पडला. त्यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. रमेश भारमल, सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, नायर दंत रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे उपस्थित होत्या.
डॉक्टरांनी करावी रुग्णांची विचारपूस...
उपचारपद्धती निश्चित करून कोरोना नियंत्रणासाठी सर्व टप्प्यांवर यशस्वी लढाई दिली. त्यामुळेच आज आपण लसीकरणाच्या टप्प्यांवर येऊन पोहोचलो आहे. यापुढील काळात आरोग्य क्षेत्रात प्रगती करत असताना रुग्ण व डॉक्टर यांच्यामध्ये गैरसमज राहू नयेत, यादृष्टीने काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉक्टर व रुग्णांचे नाते अधिक घट्ट होण्यासाठी तसेच रुग्ण आजारातून लवकर बरा होण्यासाठी डॉक्टरांनी स्वतःहून रुग्णाला भ्रमणध्वनी करून त्याच्या तब्येतीची ख्यालीखुशाली विचारली तर रुग्णांसोबत भावनिक जवळीकता वाढून हा रुग्ण अधिक झपाट्याने बरा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संशोधकाला मिळणार प्रोत्साहन...
एखाद्या डॉक्टरला संशोधनाच्या नोबेलसाठी नामांकन मिळविण्याचे स्वप्न बघून संशोधनवृत्ती वाढीस लावावी, अशी सूचना करत महापालिका सर्वप्रकारची संसाधने पुरविण्यास तयार असल्याचे काकाणी यांनी सांगितले. संस्थेच्या विकासासाठी अधिष्ठातांनी नेहमी विभागप्रमुखांशी चर्चा करावी. तसेच सर्वांना एका सुत्रात बांधून रुग्णालयाची बांधणी करावी. त्यासोबतच आपल्या कामाचा रोड मॅप तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.