मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील 'क' आणि 'ड' संवर्गातील पदे येत्या दोन महिन्यात भरण्यात येतील, असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी विधानपरिषदेत दिले.
आरोग्य सेवेत तात्पुरते भरती झालेल्या लोकांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याबाबत आणि आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला होता. यावेळी टोपे म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य विभागात चार संवर्गातील ५६ हजार ६९५ पदे मंजूर आहेत. यापैकी ३८ हजार २९८ पदे भरली असून १८ हजार ३९७ पदे रिक्त आहेत. 'ड' संवर्गाची पदे भरण्याबाबतची प्रक्रिया बिंदू नामावलीसह पूर्ण झाली आहे, त्याचप्रमाणे वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी गेल्या सरकारने सुरू केलेल्या महापोर्टलवर आलेले अर्ज ग्राह्य धरले जातील असेही ते म्हणाले.