आरोग्य विभागातील सुरक्षा रक्षक वेतनाविना
By admin | Published: August 8, 2015 10:10 PM2015-08-08T22:10:54+5:302015-08-08T22:10:54+5:30
रायगडातील ग्रामीण आणि जिल्हा रुग्णालयाची सुरक्षा सांभाळणाऱ्या सुरक्षारक्षकांना गेल्या दहा महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे सुरक्षारक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
- दहा महिने पगार नाही
पनवेल : रायगडातील ग्रामीण आणि जिल्हा रुग्णालयाची सुरक्षा सांभाळणाऱ्या सुरक्षारक्षकांना गेल्या दहा महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे सुरक्षारक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
आरोग्य विभागाला शासनाकडून निधी मिळाला नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. या संदर्भात सुरक्षा मंडळाकडून आरोग्य विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे, मात्र आरोग्य विभागाच्या तिजोरीत खणखणाट असल्याने सुरक्षारक्षकांना वेतन मिळू शकले नाही. जिल्हा रुग्णालयाच्या अधिपत्याखाली रोहा, माणगाव, कुटीर, पेण, उरण, कर्जत या ठिकाणी उपजिल्हा तर पनवेल, चौक, महाड, जसवली येथे ग्रामीण रुग्णालये आहेत.
याठिकाणी ग्रामीण रुग्णांची संख्या मोठी असते. शासनाच्या निर्देशानुसार, सर्व रुग्णालयांनी रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडे नावनोंदणी केली आहे. त्यावेळी मंडळाच्या सर्व नियम आणि अटींची पूर्तता करण्याचे आरोग्य विभागाने मान्य केले. यात प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपर्यंत सुरक्षारक्षकांचे वेतन व लेव्ही मंडळास अदा करणे बंधनकारक आहे. या सर्व गोष्टी कागदोपत्री मान्य केल्यानंतर मंडळाने एकूण ५0 सुरक्षारक्षक दिले. मात्र गेल्या दहा महिन्यांपासून सुरक्षारक्षक मंडळाकडे वेतन वर्ग करण्यात आले नाही. याबाबत रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाने आरोग्य संचालक, उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन दिले आहे. यात १० टक्के दंड आकारण्याबाबत आदेश तसेच न्यायालयीन चौकशीच्या नोटिसा सुध्दा देण्यात आल्या आहेत. गतवर्षी चार ते सहा महिन्यांचे वेतन मंडळाकडे वर्ग करण्यात आले. मंडळाने लगेचच ते सुरक्षा रक्षकांच्या खात्यात जमा केले. मात्र आता निधीच नसल्याने वेतन रखडल्याचे उत्तर रुग्णालयाचे प्रभारी अधिकारी देत आहेत.
४५.५ लाख थकले
आॅगस्ट महिना उजाडला तरी आरोग्य विभागाकडून एक रुपया सुध्दा मंडळाकडे वर्ग केलेला नाही. या उलट सुरक्षा रक्षकांना नियमानुसार राबवून घेतले जात आहे. गेल्या सगळ्या महिन्यांचा विचार करता जवळपास ४५ लाख ५२ हजार ५९१ रुपये वेतन थकले आहे. ही रक्कम वसूल करण्याची कायदेशीर प्रक्रि या मंडळाने सुरू केली आहे.
आरोग्य विभागाने मागणी केल्याप्रमाणे आम्ही सुरक्षारक्षक दिले आहेत. शासनाकडे पाठपुरावा करून निधी आणण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. मात्र तसे होत नसल्याने ही परिस्थिती उद्भवत असून सुरक्षारक्षकांचे यामध्ये हाल होत आहेत.
- श्याम जोशी, चेअरमन,
जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ