जीवनविद्या मिशनतर्फे महिलांना आरोग्य मार्गदर्शन
By admin | Published: March 26, 2017 05:44 AM2017-03-26T05:44:29+5:302017-03-26T05:44:29+5:30
जीवनविद्या मिशनने जागतिक महिला दिनानिमित्त ‘स्त्री मुक्ती नव्हे, स्त्री सन्मान’ या अभियानांतर्गत महिलां
मुंबई : जीवनविद्या मिशनने जागतिक महिला दिनानिमित्त ‘स्त्री मुक्ती नव्हे, स्त्री सन्मान’ या अभियानांतर्गत महिलांसाठी ‘डॉक्टर तुमच्या भेटीला’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. परेलमधील दामोदर हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाला जीवनविद्या मिशनच्या मार्गदर्शक डॉ. शिल्पा लाड, डॉ. वैशाली वीरकर यांनी मार्गदर्शन केले.
जनजागृतीअभावी अनेक महिलांना निरनिराळ्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे याबाबत मार्गदर्शन करताना शिल्पा लाड यांनी महिलांना होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरविषयी माहिती दिली. ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे कशी ओळखावी, या रोगाचे निदान कोणत्या चाचण्यांच्या माध्यमातून करण्यात येते, त्यावर काय उपचार करण्यात येतात, घरच्या घरी या रोगाची लक्षणे ओळखण्याची पद्धत व हा विकार टाळण्यासाठी आरोग्याबाबत काय काळजी घ्यावी? याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
वैशाली वीरकर यांनी महिलांना होणाऱ्या पीसीओडी, उच्च रक्तदाब, मधुमेह, हॉर्मोनल बदल, मासिकपाळीच्या तक्रारी याबाबत आरोग्य सल्ला दिला; तसेच हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीची लक्षणे व हृदयविकार आल्यास काय काळजी घ्यावी? हे समजावून सांगितले. सर्व शारीरिक विकारांचे मूळ हे प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक अवस्थेवर अवलंबून असते. यासाठी उपस्थित महिलांना मनाचे शास्त्र व मनाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. मनाचे सामर्थ्य सांगताना मन मजबूत करण्यासाठी नेमके काय करावे? याबाबत या वेळी मार्गदर्शन करण्यात आले. (प्रतिनिधी)