Health: अवयवदानात महाराष्ट्राला परराज्यातून मदतीचे 'हात', तीन वर्षांत दहा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
By संतोष आंधळे | Published: June 25, 2023 10:00 AM2023-06-25T10:00:31+5:302023-06-25T10:00:53+5:30
Organ Donation: वैद्यकीय विश्वातील प्रगतीमुळे गेल्या तीन वर्षांत राज्यात हात प्रत्यारोपणाच्या दहा शस्त्रक्रिया पार पडल्या. त्यामुळे अपघातात हात गमावलेल्या लोकांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र, या सगळ्या प्रक्रियेत हात दान करण्यात महाराष्ट्र पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.
- संतोष आंधळे
मुंबई : वैद्यकीय विश्वातील प्रगतीमुळे गेल्या तीन वर्षांत राज्यात हात प्रत्यारोपणाच्या दहा शस्त्रक्रिया पार पडल्या. त्यामुळे अपघातात हात गमावलेल्या लोकांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र, या सगळ्या प्रक्रियेत हात दान करण्यात महाराष्ट्र पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन वर्षांत हात प्रत्यारोपणाच्या दहापैकी नऊ शस्त्रक्रियांत हातांचे दान इतर राज्यांतून आले आहे.
राज्यात २७ ऑगस्ट २०२० या दिवशी हाताच्या प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया मोनिका मोरे या तरुणीवर झाली होती. त्यानंतर अशा दहा शस्त्रक्रिया झाल्या. त्यात फक्त एक मुंबईत मेंदूमृत दात्याचे हात दान करण्यात आले होते. बाकी सर्व दान इंदूर, चेन्नई, सुरत, अहमदाबाद या परराज्यातील शहरांतून झाले आहे. राज्य अवयव आणि उती पेशी प्रत्यारोपण संस्था संचालिका डॉ. सुजाता पटवर्धन यांनी सांगितले की, कोणते अवयवदान करायचा हा अधिकार पूर्णपणे दात्याच्या नातेवाइकांचा असतो.
आमच्याच रुग्णालयात हात प्रत्यारोपणाच्या नऊ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. सर्व रुग्ण चांगले आहेत. मात्र, आपल्या राज्यात ज्या पद्धतीने हातदानाबाबत जनजागृती होणे अपेक्षित आहे. ते होताना दिसत नाही. बहुताश हाताचे दान बाहेरच्या राज्यातून झाले आहे. सध्याच्या घडीला हात मिळावेत. म्हणून तीन-चार व्यक्ती प्रतीक्षा यादीवर आहेत. मात्र, आपल्याकडे हात दान होत नसल्याने त्याना अजून किती काळ वाट बघावी लागेल, हे सांगणे कठीण आहे. - डॉ. नीलेश सातभाई