शिवरायांचा तेजस्वी इतिहास दररोज जिवंत करणाऱ्या रायगडावरील 27 गाईड्सना आरोग्य विमा संरक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 07:29 PM2024-02-27T19:29:50+5:302024-02-27T19:30:51+5:30

सर्व गाईड्सने मुख्यमंत्र्यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला असून शिवकार्यासाठी आमचा हुरूप आणखी वाढल्याचे म्हटले आहे.

Health insurance cover for 27 guides at Raigad who bring alive the glorious history of Shivaji maharaj every day | शिवरायांचा तेजस्वी इतिहास दररोज जिवंत करणाऱ्या रायगडावरील 27 गाईड्सना आरोग्य विमा संरक्षण 

शिवरायांचा तेजस्वी इतिहास दररोज जिवंत करणाऱ्या रायगडावरील 27 गाईड्सना आरोग्य विमा संरक्षण 

मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड आजही प्रत्येक मराठी मनाला प्रेरणा देत असते. याच किल्ले रायगडचा ज्वलंत इतिहास अनेक वर्षांपासून पर्यटकांसमोर हुबेहूबपणे मांडणाऱ्या गाईड्सना सुविधांची वाणवा होती. हीच बाब लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने मदतीचा हात दिला असून तब्बल 27 गाईड्सना आरोग्य विम्याचे संरक्षण दिले आहे. याबाबतचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवराज्याभिषेक दिनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पूर्ण केल्याने या सर्व गाईड्सने त्यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला असून शिवकार्यासाठी आमचा हुरूप आणखी वाढल्याचे म्हटले आहे.

किल्ले रायगडावरील एकूण 27 गाईड्स येणाऱ्या पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज व  छत्रपती संभाजी महाराजांची महती सांगत असतात. अनेक वर्षे ऊन, वारा, पाऊस याला तोंड देत सर्व गाईड्स मंडळी रायगडावर निस्सीम प्रेम करत महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास दररोज जिवंत करत असतात. या गाईड्सना शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या वतीने दरवर्षी ड्रेस कोड प्रदान केला जातो . तसेच, मूर्ती पूजनाचे साहित्य दिले जाते.  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडून रायगडावरील पाच ठिकाणी 2021 पासून अखंडपणे पुष्पहारसेवा सुरू केली आहे. यामध्ये आणखी एका उपक्रमाची भर पडली असून 27 गाईड्सना आरोग्य विमा संरक्षणही प्रदान करण्यात आलं आहे. यासाठी स्थानिक आमदार  भरत गोगावले आणि मुक्ताई गारमेंटचे प्रोपायटर, शिवसेना जिल्हाप्रमुख  महेश चिवटे यांच्याकडूनही सहकार्य करण्यात आलं आहे.

विमा कवच मिळालेल्या तरुणांमध्ये रायगड गाईड संघटनेचे पप्पू औकीरकर (अध्यक्ष), रामचंद्र औकीरकर , संदीप ढवळे, सखाराम औकीरकर, संदीप शिंदे, सुनील शिंदे, दिलीप औकीरकर, निलेश औकीरकर, गणेश झोरे, सुनील औकीरकर, मनेश गोरे, सिताराम औकीरकर, सुरेश आखाडे, अंकेश औकीरकर, बाळाराम महाबळे, प्रदीप औकीरकर, सिताराम झोरे, लक्ष्मण औकीरकर, आकाश हिरवे, रमेश औकीरकर,  सागर काणेकर, चंद्रकांत औकीरकर अशा गाईड म्हणून काम करणाऱ्या  एकूण 27 युवकांचा समावेश आहे. या विमा कवचमध्ये वार्षिक पाच लाख रुपये कव्हर असून यामध्ये सर्व आजारांचा समावेश आहे. यामध्ये गाईड्सच्या कुटुंबालाही आरोग्य विमा कवच देण्यात आले आहे.

गेले तीन वर्षे सुरू आहे अखंडपणे पुष्पहारसेवा

मुक्ताई गारमेंट यांच्या सौजन्याने दुर्गदुर्गेश्वर श्रीमंत रायगडावर पाच ठिकाणी अखंडपणे पुष्पहार सेवा केली जाते. यामध्ये राजसदर येथील आणि होळीचा माळ येथील पूर्णाकृती छत्रपती शिवरायांचा पुतळा, गडावरील आई शिरकाई देवीचे मंदिर,  श्री जगदीश्वराचे मंदिर आणि श्री शिवसमाधी या ठिकाणी दररोज पाण्याचा अभिषेक करून पुष्पहार अर्पण केला जातो. यासाठी खास पुजाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनाही योग्य मासिक मानधन दिले जाते.

Web Title: Health insurance cover for 27 guides at Raigad who bring alive the glorious history of Shivaji maharaj every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड