Health: मुंबईत गोवरची साथ, आता आव्हान लसीकरणाचे !
By संतोष आंधळे | Published: November 17, 2022 09:06 AM2022-11-17T09:06:02+5:302022-11-17T09:06:42+5:30
Measles outbreak in Mumbai: गोवरला प्रतिबंध करणारी लस उपलब्ध असल्याने त्यास पायबंद घालणे शक्य आहे. मात्र, त्याकरिता ती लस घेणे गरजेचे आहे. काही नागरिकांमध्ये मुलांना लस देण्यावरून मतभिन्नता आढळून येत असल्याने लस उपलब्ध असूनसुद्धा ती घेतली जात नाही.
- संतोष आंधळे
मुंबई : गोवरला प्रतिबंध करणारी लस उपलब्ध असल्याने त्यास पायबंद घालणे शक्य आहे. मात्र, त्याकरिता ती लस घेणे गरजेचे आहे. काही नागरिकांमध्ये मुलांना लस देण्यावरून मतभिन्नता आढळून येत असल्याने लस उपलब्ध असूनसुद्धा ती घेतली जात नाही. त्यामुळे या अशा नागरिकांचे समुपदेशन करून त्यांना आजाराचे दुष्परिणाम आणि लसीचे महत्त्व पटवून देण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. मंगळवारी, मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १९ हजार ८९४ बालकांना लसीकरणासाठी पात्र असल्याचे कळविले असून, त्यांना लस देण्यासाठी येत्या काळात उपाययोजना केल्या जाणार आहेत.
गोवरची लस बाळाचा जन्म झाल्यानंतर नऊ महिन्यांनी डॉक्टर देतात. त्यानंतर १५ महिन्यांनी दुसरी लस गालगुंड, गोवर, रुबेला होऊ नये म्हणून देण्यात येते. गेली अनेक दशके ही लस नागरिकांनी घेतलेली आहे. त्याचा फायदा दिसून आलेला आहे. महापालिकेच्या एम. ईस्ट या वाॅर्डात मोठ्या प्रमाणात या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. गोवरसदृश लक्षणे असणाऱ्या काही बाळांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोवरच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागातील अधिकाऱ्याची तारांबळ उडाली आहे. अन्य वॉर्डांतील कर्मचारी या कामाकरिता घेतले जात आहेत. सर्वेक्षण करून किती बालकांनी लस घेतली नाही, याची रीतसर नोंदी ठेवली जात आहे. त्यानुसार जवळपास २० हजार मुलांचे लसीकरण झाले नसल्याचे दिसून आल्याने येत्या काळात त्यांचे लसीकरण करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे.
वॉर्डांमध्ये जनजागृती
आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लस घ्यावी तसेच या आजाराची माहिती नागरिकांना मिळावी याकरिता खासगी डॉक्टर, महापालिकेचे डॉक्टर आणि जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार महापालिकेच्या एम. ईस्ट या गोवरबाधित असलेल्या वॉर्डमध्ये फिरत आहेत. तसेच विविध समाजांतील धर्मगुरूंच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यांना लसीचे महत्त्व समजून सांगण्यात येत आहे.