आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 11:11 PM2018-06-04T23:11:39+5:302018-06-04T23:11:39+5:30
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून पत्ता कापण्यात आल्यानंतर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राजीनामा दिला
मुंबई : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून पत्ता कापण्यात आल्यानंतर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राजीनामा थांबवण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी दीपक सावंत यांना उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीला हजर रहायला सांगितलं आहे. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्याआधी त्यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सुपूर्द केला.
मुंबई पदवीधर मतदारसंघातून होणाऱ्या निवडणुकीच्या उमेदवाराबाबत मोठा निर्णय घेताना शिवसेनेने विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा पत्ता कट झाला आहे. विलास पोतनीस हे शिवसेनेचे बोरिवलीचे विभागप्रमुख आहेत. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीबाबत शिवसैनिकांमध्ये आणि विशेष करून युवासेनेमध्ये नाराजी होती. त्यामुळे सावंत यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.