आरोग्यमंत्री राजेश टोपेंची भावनिक साद, शाळा अन् कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पत्र
By महेश गलांडे | Published: February 24, 2021 01:34 PM2021-02-24T13:34:44+5:302021-02-24T13:36:35+5:30
राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी एक दिवसापूर्वीच हॉस्पिटलमधून जनतेला पत्र पाठवलं आहे, त्यात म्हटलंय की, गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरुद्धची लढाई लढत आहोत,
मुंबई - राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला आवाहन करताना सूचक इशारा दिला आहे, कोरोना टाळण्यासाठी मास्क घाला, शिस्त पाळा अन्यथा लॉकडाऊन करू असं सांगत पुढील ८ दिवस महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे, ते रुग्णालयात उपचार घेत असून तेथूनच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी भावनिक पत्र लिहलंय.
राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी एक दिवसापूर्वीच हॉस्पिटलमधून जनतेला पत्र पाठवलं आहे, त्यात म्हटलंय की, गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरुद्धची लढाई लढत आहोत, शासनाची खंबीर भूमिका ठोस उपाययोजना व प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक कोरोना योद्धे, विशेषत: डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करू शकलो, मात्र अद्यापही कोरोना गेलेला नाही, तो पुन्हा डोके वर काढत आहे, तेव्हा पुन्हा एकदा सामुहिक लढाई लढावी लागणार आहे. आता, आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना पत्राद्वारे संदेश दिला आहे.
शाळा अन् महाविद्यालये नुकतेच सुरु झाले असून कोरोना वाढताना दिसत आहे. तुमचं बागडण्याचं, खेळण्याचं आणि मैदानावर घाम गाळण्याचं वय असूनही गेल्या वर्षभरापासून आपण घरीच बसून आहात. कोरोनावर मात करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे, सर्वप्रथम तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. तसेच, आई-वडिल, भाऊ-बहिणी आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी. बाहेरुन आल्यानंतर तोंड-हात पाय धुतले जातात का, मास्क वापरला जातो का, कोरोनाच्या नियमावलीचे पालन केले जाते का, हे तुम्ही काळजीपूर्वक पाहा. कोरोनाची काही लक्षणे दिसल्यास संबंधित सदस्याला तत्काळ सरकारी रुग्णालयात घेऊन जा. मित्रांनो, आजचा विद्यार्थी देशाचा उद्याचा आधारस्तंभ आहे, तरुणाचं मन सकारात्मक, बुद्धी सतेच आणि शरीर सदृढ पाहिजे, तरच त्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतात. तर, मग चला मला मदत करणार ना, मला तुमची खात्री आहे. आपण, ही लढाई नक्की जिंकू.... असे भावनिक आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 24, 2021
टोपे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे पत्र शेअर केले आहे. तसेच, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी राज्यातील जनतेला कोरोना नियमावलीचं पालन करण्याचं बजावलं आहे.