व्हायरल ऑडिओ क्लीपबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं स्पष्टीकरण
By महेश गलांडे | Published: February 17, 2021 10:53 PM2021-02-17T22:53:35+5:302021-02-17T22:54:17+5:30
राजेश टोपे यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लीपमधील व्यक्ती, मास्क न घालणाऱ्यावर कारवाई व दंड करण्याच्या सूचना देत आहे. तसेच, मंगल कार्यालय आणि कोचिंग क्लासेसवरही नियमांचे पालन होत नसेल तर कारवाई करा.
मुंबई - राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहेत. मुंबईनंतर एकट्या अमरावती जिल्ह्यात आज 498 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोनाचा वाढता आकडा मोठे संकट घेऊन येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन लावणार नाही, परंतू निर्बंध घालावे लागतील असा इशारा दिला आहे. स्थानिक पातळीवर कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. तर, मास्क वापरण्यासाठी वारंवार सांगण्यात येत आहे. आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांच्या नावाने सोशल मीडियात एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. मात्र, या ऑडिओ क्लीपमधील आवाज माझा नसल्याचे राजेश टोपे यांनी ट्विटरवरुन सांगितले आहे.
राजेश टोपे यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लीपमधील व्यक्ती, मास्क न घालणाऱ्यावर कारवाई व दंड करण्याच्या सूचना देत आहे. तसेच, मंगल कार्यालय आणि कोचिंग क्लासेसवरही नियमांचे पालन होत नसेल तर कारवाई करा. दुसऱ्यांदाही तसेच आढळून आल्यानंतर ते कार्यालय व क्लासेस सील करा, अशा सूचना या आवाजातील व्यक्ती देत आहे. एकंदरीत 6 मिनिटांची ही ऑडिओ क्लीप असून यामध्ये स्थानिक प्रशासनालाही सूचना दिल्याचे दिसून येत आहे. मात्र, या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लीपमधील आवाज माझा नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे, ही क्लीप फॉरवर्ड करण्याऐवजी राजेश टोपेंचा मेसेज फॉरवर्ड करणे, हे सुजाण नागरिकाचे लक्षण आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप माझ्या नावाने व्हायरल होत आहे. मात्र त्या क्लिपमधील आवाज माझा नाही.
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 17, 2021
राज्यात आज 4787 नवीन रुग्ण
राज्यात आज दिवसभरात 4,787 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. मंगळवारी हा आकडा 3,663 एवढा होता. यामध्ये आज जवळपास 1100 रुग्णांची वाढ झाली आहे. तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे. 3,853 जण बरे झाले आहेत, असे आरोग्य खात्याने सांगितले. राज्यात एकूण 20,76,093 कोरोनाबाधित सापडले आहेत. यापैकी 19,85,261 बरे झाले आहेत. सध्या 38,013 रुग्ण उपचार घेत आहेत. मृतांचा आकडा 51,631 झाला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्ण उपचार घेत आहेत. अनुक्रमे 4530, 4681, 7509 रुग्ण आहेत. राज्यातील मृत्यूदर 2.49 टक्के एवढा आहे.