Join us

मुख कर्करोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नोंदसूची बनविणार - आरोग्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 2:14 AM

नॅशनल ओरल कॅन्सर रजिस्ट्री-एनओसीआरद्वारे समाजात मुख कर्करोगाचा प्रादुर्भाव किती आहे याचा अंदाज घेणे आणि त्याचे नियंत्रण करणे यासाठी आराखडा सादर करेल

मुंबई : नॅशनल ओरल कॅन्सर रजिस्ट्री-एनओसीआरद्वारे समाजात मुख कर्करोगाचा प्रादुर्भाव किती आहे याचा अंदाज घेणे आणि त्याचे नियंत्रण करणे यासाठी आराखडा सादर करेल. राज्य शासनाने मुख कर्करोगासाठी तपासणी टाटा कर्करोग रुग्णालयाच्या मदतीने करणे, हा कार्यक्रम राज्यात १ डिसेंबरपासून युद्धपातळीवर सुरू केला आहे. या उपक्रमाला इंडियन डेंटल असोसिएशनचे सहकार्यही मोलाचे आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले.इंडियन डेंटल असोसिएशनने बुधवारी प्रभादेवी येथील मुख्यालयात ‘राष्ट्रीय मौखिक कर्करोग दिन’ म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. संस्थेच्या कर्करोगाविरोधातील या लढ्याची घोषणा करतानाच आयडीएचे मानद सरचिटणीस डॉ. अशोक ढोबळे यांनी ‘राष्ट्रीय मौखिक कर्करोग नोंदसूची’चा आरंभ केला असून, त्याद्वारे या रोगाची अद्ययावत माहिती गरजूंना मिळणार आहे.राष्ट्रीय मुख कर्करोग नोंदणी या उपक्रमात राष्ट्रीय मुख कर्करोग नोंदणी (एनओसीआर) कार्यक्रमाद्वारे देशभरातील कर्करोग-पूर्व आणि मुख कर्करोगाच्या केसेसची सर्व माहिती एकत्र एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. या सूचीच्या माध्यमातून कर्करोगजन्य आणि मौखिक कर्करोगाची राष्ट्रीय स्तरावरील रुग्णांची माहिती केंद्रीय स्तरावर प्राप्त होईल. ही सूची कर्करोगावरील माहिती व आकडेवारीचा डेटाबेस म्हणून काम करेल. देशात मौखिक कर्करोगाचे रुग्ण वाढत असताना त्याचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक नियोजन आणि धोरणे आखणी यांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरेल, असेही डॉ. ढोबळे म्हणाले.मौखिक कर्करोगाची प्रकरणे देशात वाढत आहेत. आपल्या देशात तंबाखूचे सेवन हे थेट तंबाखू खाणे, गुटखा, बिडी आणि सिगारेट या प्रकारांमधून होते. मौखिक कर्करोग हा अव्वल तीन कर्करोग प्रकारांत मोडतो. देशातील एक दशांश प्रौढ हे तंबाखू सेवनाशी संबंधित रोगाने मृत पावतात. तंबाखू हा दरवर्षी १.५ लाख कर्करोग रुग्ण, ४.२ दशलक्ष हृदयरोग प्रकरणे आणि ३.७ दशलक्ष फुप्फुस रोग प्रकरणांसाठी कारणीभूत ठरतो. १४ कोटी पुरुष आणि ४ कोटी स्त्रिया या तंबाखूचे सेवन करतात. १५ ते ४९ वर्षे वयोगटातील ५७ टक्के पुरुष लोकसंख्या तंबाखूचे सेवन करते तर महिलांमधील हे प्रमाण एक दशांश एवढे आहे. दरवर्षी तंबाखूच्या सेवनाला नव्याने सुरुवात करणाºया युवकांची संख्या ५ हजार एवढी मोठी आहे. ही परिस्थिती भविष्यातही सुधारणे कठीण दिसते. २०२०पर्यंत एकूण मृत्यूंपैकी १३ टक्के मृत्यू हे तंबाखूच्या सेवनामुळे होणार असल्याचा अंदाज आहे. ३८.४ दशलक्ष विडी पिणारे आणि १३.२ टक्के सिगारेट पिणारे लोक हे अकाली मृत्यूला सामोरे जातील, असाही अंदाज आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांमधील ग्रामीण भागातील जनता मोठ्या प्रमाणावर तंबाखू सेवन करते.