लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ पदे रिक्त असल्याने त्याचा भार कनिष्ठ अधिकाऱ्यांवर पडत आहे. या कार्यपद्धतीवर अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून, रुग्णांच्या आरोग्यसेवेवर त्याचा परिणाम होत असल्याचे वृत्त अलीकडेच ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. आता या वृत्ताची दखल घेत रिकामी पदे तत्काळ भरण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली असून ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील ११,९०३ जागांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात निघणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या पदाच्या जाहिरातीचा मसुदा काय असावा, त्याची जाहिरात कशा पद्धतीने करावी, यावर सध्या विभागात खल सुरू असून, जाहिरात लवकरच प्रसिद्ध हाेण्याची शक्यता आहे. रिक्त जागा एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत भरल्या जातात.
या जागा आहेत रिक्त
‘गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यांसारख्या पदांचा समावेश असतो. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यांसारख्या पदांचा समावेश असतो. या दोन्ही संवर्गातील मोठ्या संख्येने पदे रिकामी आहेत.
उदासीनता का? प्रश्न अनुत्तरित
या विभागातील रिक्त पदे हा आता चर्चेचा विषय झाला आहे. कोरोनाकाळात आरोग्य विभागाचे महत्त्व अधोरेखित झाले असतानाही विभागातील वरिष्ठ पदे भरण्यास एवढी उदासीनता का दाखविली गेली, हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. राज्यात साथीच्या आजाराचे संकट कायम असते. या अशा काळात जर पदे रिकामी असतील तर नागरिकांना योग्य उपचार कसे मिळणार? असा प्रश्न विचारला जात आहे.
‘लोकमत’ने वेधले होते लक्ष
आरोग्य क्षेत्रातील सरकारी अनास्थेविषयी तसेच रुग्णालयांच्या स्थितीवर ‘लोकमत’ने १६ ऑगस्टच्या अंकात झगझगीत प्रकाश टाकला. आरोग्य विभागातील अनेक वरिष्ठ पदे रिक्त असल्याचे वृत्त १७ ऑगस्ट रोजी प्रकाशित केले. तसेच १८ ऑगस्टच्या अग्रलेखातून आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले.