Join us  

खोपोलीकरांचे आरोग्य धोक्यात

By admin | Published: June 17, 2014 1:50 AM

भाजी मंडईतील कचऱ्यामुळे खोपोली परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.

अमोल पाटील , खालापूरभाजी मंडईतील कचऱ्यामुळे खोपोली परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. मंडईतून निघणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर पालिका प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सुंदर आणि स्वच्छ खोपोलीचे स्वप्न अपुरे राहिले आहे. ओल्या आणि सुक्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरली आहे. स्वछता अभियानांतर्गत पालिकेने सुंदर शहर निर्माण करण्याचा प्रयत्न केला खरा परंतु त्याचे सकारात्मक परिणाम अद्याप दिसून आलेले नाही. मुंबई-पुणे महामार्गालगत असणाऱ्या भाजी मंडईतून दररोज शेकडो टन ओला कचरा जमा होत आहे. फळभाज्या, मच्छी, फळे यापासून टाकाऊ कचरा थेट महामार्गालगत जमा होत असल्याने भाजी मार्केट शेजारी, बसस्थानक, पोलीस ठाणे इमारतीत दिवसभर कामासाठी येणारे नागरिकही दुर्गंधीने हैराण होतात. त्यातच कचरा उचलण्याचे काम सकाळी उशिरा सुरु होऊन दुपारपर्यंत हे काम सुरु रहात असल्याने परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. भाजी मंडई परिसरात एकच कचराकुंडी आहे. पावसाळा सुरु वात झाल्याने खबरदारी म्हणून उपाय योजना करणे क्रमप्राप्त असूनही पालिकेकडून दुर्लक्ष होताना दिसते. याच ठिकाणी गटार असून कचऱ्यातून निघणारी घाण गटारात जाते. त्यामुळे गटारे तुंबतात. मंडईमध्ये व्यापारी, ग्राहकांची नेहमीच मोठी गर्दी असते. मात्र पालिकेकडून स्वच्छता आणि सफाईसाठी योग्य उपाययोजना राबविल्या जात नसल्याने पादचाऱ्यां सह वाहनचालकही पालिकेच्या कारभारावर नाखूश आहेत. यावर त्वरित उपाययोजना न केल्यास, पावसाळ्यात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.