Join us  

वातावरणात बदलांमुळे आरोग्याला धोका ; तब्येत सांभाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:09 AM

मुंबई : दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री थंडी अशा वातावरणामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, ताप आणि ...

मुंबई : दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री थंडी अशा वातावरणामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, ताप आणि खोकल्याने लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक बेजार झाले असल्याचे निरीक्षण वेगवेगळ्या वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

शहर उपनगरात पावसाळ्याच्या दिवसांत अचानक तापमानात वाढ झाली आहे. आता दिवसा उन्हाचा चटका वाढला आहे. अत्यंत कमी वेळेत होणाऱ्या अशा वातावरणातील बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. फिजिशिअन डॉ. सचिन गांधी म्हणाले, "सकाळी उन्हाचा चटका आणि मध्येच पाऊस असे वातावरण सध्या आहे. त्यामुळे लहान मुलांबरोबरच मोठ्या माणसांनाही सर्दी, खोकला, ताप असा त्रास होत आहे. अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या आठवशकभरापासून वाढली आहे.''

डॉ. संतोष धुमाळे म्हणाले, "पाऊस आणि आता पुन्हा वाढणारे तापमान असे बदल अवघ्या आठवड्यात झाले. वातावरणातील बदलांमुळे शरीराचे तापमान स्थिर राहत नाही. त्यातून प्रतिकारशक्ती कमी होऊन, विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. त्यामुळे शहरात सध्या थंडी, ताप, सर्दी, खोकला अशा रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.''

विषाणूंच्या वाढीस पोषक स्थिती

कमी वेळेत झालेल्या हवामानातील बदलांमुळे हवेतील विषाणूंच्या वाढीसाठी पोषक स्थिती निर्माण होते. या विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण यामुळे वाढले आहे. त्यातून थंडी, ताप, सर्दी आणि खोकल्यासारखे आजार वाढले आहेत, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.

काय काळजी घ्यावी?

- गरम पाणी पिणे किंवा गरम पाण्याची वाफ घेणे हितावह आहे.

- कोमट किंवा गरम पाण्याचा वापर करावा.

- खोकताना किंवा शिंकताना तोंड व नाकावर रुमाल धरावा. नाकातील स्रावातून निघणारे विषाणू हवेत पसरतात आणि त्यामुळे आजाराचा संसर्ग वाढतो. सर्दी किंवा खोकला झालेल्या रुग्णाचा हातरुमाल कुटुंबातील इतर व्यक्तींनी वापरू नये.

- डासांपासून बचाव करण्यासाठी खिडक्यांना जाळ्या लावणे.

- सर्दी, खोकला या आजारांचा संसर्ग होऊ नये, यासाठी वारंवार हात धुणे गरजेचे.

- दम्याच्या रुग्णांनी कमी तापमानात जाणे टाळावे. घराबाहेर पडल्यावर नाकावर रुमाल किंवा स्कार्फ बांधावा.