आरोग्य ‘स्वयंपूर्णा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:15 AM2021-02-20T04:15:03+5:302021-02-20T04:15:03+5:30
आपल्या स्वतःच्या आरोग्य हक्कांविषयी जाणून घेऊन महिलांनी आपले आयुष्य सुंदर सार्थक केले तर त्याचा पडसाद त्यांचे कुटुंब, समाज, देशावर ...
आपल्या स्वतःच्या आरोग्य हक्कांविषयी जाणून घेऊन महिलांनी आपले आयुष्य सुंदर सार्थक केले तर त्याचा पडसाद त्यांचे कुटुंब, समाज, देशावर सहज पडतो. गरज आहे आरोग्य स्वयंपूर्णतेच्या संकल्पाची आणि त्या दिशेने वाटचाल करण्याची! पण आज समाजात एक स्त्रीरोग चिकित्सक म्हणून काम करताना दिसणारे चित्र कसे आहे...
काहीच वर्षांपूर्वीची गोष्ट... गडचिरोलीच्या एका भागात कॅम्पचे आयोजन केले होते, तेथे एका छोट्या घरासमोर एक लहान मुलगी मला भेटली. मोठ्या कौतुकाने तिला विचारले, ‘नाव काय आहे गं तुझे?’ निरागस डोळ्यांनी तिने मला न्याहाळले आणि बोबडे बोल आले ‘नकाेशी’. आत्ममग्न हाेण्याची वेळ आली! आपल्या मुलीचे नाव नकोशी ठेवताना काय विचार केला असावा पालकांनी? स्त्रीच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा विचार केला तर आज आपल्या भारतात स्त्री आरोग्याची काय स्थिती आहे?
१) अर्भकावस्था - स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण कमी असले तरीही अजून ही गोष्ट पूर्ण बंद झाली नाही.
२) लहान मुलींवर लैंगिक अत्याचार व त्याचे दूरगामी परिणाम आजूबाजूला बघायला मिळतात.
३) लैंगिक आजार, प्रजनन संस्थेचे आजार, गर्भस्राव व गर्भपात, चुकीच्या पद्धतीने केलेला (तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय) हार्मोनल गोळ्यांचा अतिरिक्त वापर, गर्भारपणासंबंधीचे आजार, वैवाहिक आयुष्यातील हिंसकपणा (आर्थिक, सामाजिक, शारीरिक) व त्यातून निर्माण होणारी कुचंबणा व घुसमट.
४) मासिक पाळीच्या विविध समस्या व त्याकडे कुटुंबीयांचे होणारे दुर्लक्ष, आजार अंगावर काढण्याची स्त्रियांची सहज प्रवृत्ती असल्याने उद्भवणाऱ्या समस्यांचे प्रमाणही फार मोठे आहे.
अतिरिक्त चिंता, ताण-तणाव, कुचंबणा यामुळे स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढते आहे. प्रजननांगाचे आरोग्य, स्वच्छता, शिक्षण अभावामुळे वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला व तपासणी न केल्याने गर्भाशय मुखाचा कर्करोग त्रासदायक ठरताे आहे. सरासरी स्त्रियांना पाठदुखी, कंबरदुखी, अनुत्साह, औदासीन्य, ॲनिमिया, हार्मोनल, असंतुलनाच्या त्रासांना वारंवार सामोरे जावे लागते, ज्याचा त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. कौटुंबिक आर्थिक व्यवस्थेवर तो परावर्तित होतो व राष्ट्राच्या विकासालाही अडथळा ठरताे.
आज २६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महिला आरोग्य दिवस साजरा करताना प्रकर्षाने जाणवले की स्त्रियांनी आपल्या आरोग्य स्वतंत्रतेची जबाबदारी घेतली पाहिजे या आरोग्य स्वयंपूर्णतेतील अडथळे जाणवले ते असे -
१) स्त्रिया आरोग्यापेक्षा करिअर, शिक्षण, व्यवसाय, घर इ. गोष्टींना प्राधान्य देतात व शरीराच्या छोट्या-मोठ्या आजारविषयक सिग्नलकडे पूर्णत: दुर्लक्ष करतात.
२) बाह्य सौंदर्याला अग्रक्रम देऊन फॅड डाएट, कृत्रिम सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेकी वापर इत्यादींना बळी पडतात.
३) स्त्रिया दुसऱ्या स्त्रीला पाठिंबा, प्रोत्साहन, सहानुभूतीच्या भावना समजून घेण्याच्या शक्तीचे सामर्थ्य विसरतात.
४) व्यायामाचा अतिरेक व अभाव याचा सुवर्णमध्य साधला जाणे कमी पडते.
५) 'स्त्री'त्वाचा स्वीकार करून स्वतःच्या शक्तींना ओळखणे याऐवजी स्त्रीत्वाचे भांडवल करून स्वतःचे खच्चीकरण करण्याचे प्रमाण अधिक आहे.
सर्वांगीण आरोग्यासाठी पुढील पंचसूत्रीचा अवलंब स्त्री स्वयंपूर्ण क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल ठरेल.
(i)
सजगता
१) स्त्रियांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण शक्ती असते, ज्या योग्य तिला बऱ्याच गाेष्टी समजतात, त्या शक्तीचा स्वतःतील आरोग्य क्षमता ओळखण्यासाठीही उपयोग करून घ्यायला हवा.
शरीरातील छोटे-मोठे बदल योग्य वेळेत ओळखून त्यानुसार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
१) मासिक पाळी संपल्यावर स्वतःचे स्वतः स्तन (परीक्षण) तपासून पाहणे.
२) मासिक पाळीतील बदल व तदनुषंगी लक्षणांना टिपून ठेवणे.
३) समाजात वावरताना पुरुष सहकाऱ्यांसह काम करताना सावधपणा अत्यंत महत्त्वाचा आहे.
४) स्वतःच्या संवेदनांना ओळखून अग्रक्रमाने त्यावर प्रथम फुंकर स्वत:च घालणे महत्त्वाचे असते.
५) स्वतःच्या स्त्रीविषयक तपासण्या पॅप स्मिअर, सोनोग्राफी इत्यादींना अग्रक्रम द्यावा.
(ii) स्वत:च व्हा स्वतःचे आहार नियाेजक
आहार आजारावर प्रतिबंधक व उपचारात्मक उपाय आहे. आरोग्याचा जणू पायाच आहे. ठरावीक वयाच्या टप्प्यावर आपला पारंपरिक आहार घेतलाच पाहिजे.
तृणधान्य
सातू - शरीराला स्थिरत्व देते. वजन कमी करण्यास मदत करते, त्वचेचे सौंदर्य सुधारते.
नाचणी - उन्हाळा सुसह्य करते, वजन नियंत्रित ठेवते.
मका - कॅन्सरविरोधी लढण्याची क्षमता वाढवते.
राजगिरा - कुपोषणापासून, थकव्यापासून दूर ठेवते.
जव - कोलेस्ट्रॉल, चरबी कमी करण्यास मदत.
सुकामेवा
बदाम - स्मरणशक्ती, उत्साह वाढवणारा
अक्रोड - कॅन्सर संधीवाताविरोधी लढण्याची क्षमता देते.
मकाणे - ‘स्त्री’ स्वास्थ्यवर्धक.
आहाळीव - बाळंतपणात रक्त वाढवण्यासाठी उपयुक्त.
डिंक - चिडचिड, थकवा कमी करण्यास मदत करते.
शिंगाडा - गर्भारपणात गर्भाच्या उत्तम वाढीसाठी उपयोगी.
विड्याचे पान - गर्भारपणात रक्तदाब नियंत्रणात ठेवते.
शेवग्याच्या पानांची भाजी - कुपोषण दूर करते.
कुळीथ - चरबी कमी करण्यासाठी, शरीराला हलकेपणा देण्यासाठी उपयोगी आहे.
गवती चहा - हृदयाला हितकारक, मधुमेही रुग्णांना उपयोगी आहे.
हिरवे मूग - तापात येणारा थकवा दूर हाेताे.
ओले हरभरे - कॅन्सरच्या वाढीला आळा घालतात. रजोनिवृत्ती त्रास कमी होतो. हाडे ठिसूळ होऊ देत नाही.
या काही आहार घटकांचा विसर पडू लागला आहे. स्त्रियांनी याचे महत्त्व लक्षात घेऊन स्वतःच्या आरोग्यासाठी त्याचा उपयोग करायला हवा. आहार नियोजन करायला हवे.
(iii) व्यवस्थापन भावनांचे
१) अंतर्मनाच्या कप्प्यात दडलेल्या स्पंदनांचा वेळोवेळी आढावा घेणे.
२) संयमित पद्धतीने व्यक्त व्हायला शिकणे.
३) नकोशा भावनांचा निचरा करणे.
४) योग्य ठिकाणी सुसंवादातून आपल्या वेदना सहन करायला शिकणे, सल्ला घेणे.
५) योग्य त्या ठिकाणी प्रतिकार करण्याचा आत्मविश्वास बाळगणे
(iv) मानसिक आरोग्यासाठी आनंदी व प्रसन्न राहणे, छंद जोपासणे.
(v) झोप, विश्रांती स्वतःसाठीच्या वेळेचे नियोजन करणे, शरीरशुद्धी, हार्मोन्सबद्दलचे सामान्य ज्ञान, शरीर क्षमता वाढवणारे व्यायाम, योग साधना याबद्दल जागरूक राहणे. नैसर्गिक वनौषधींचा उदाहरणार्थ आवळा, हळद, सुंठ, जेष्ठीमध इत्यादीचा वापर करून प्रतिकारक्षमता वाढवणे, यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे.
थोडक्यात महत्त्वाचे
१) आरोग्य हक्क स्त्रीमधील मनुष्यत्व जपतात.
२) स्वतःच स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घ्यायला शिकले पाहिजे.
३) यशस्वी आयुष्याचा पाया जे सर्वांगीण आरोग्य आहे, त्याला पायदळी देऊन उपयोग नाही.
४) संवेदनशीलता स्त्रियांचा गुण आहे, तो दुबळेपणा न ठरता सामर्थ्य व्हावे.
५) स्त्रियांचे आरोग्य हक्क जपण्यास मदत करणे समाजाचे कर्तव्य आहे.
प्रगतीच्या क्षितिजावर राष्ट्राला भरारी घेण्यासाठी ‘स्त्री’ आरोग्य ऊर्जेच्या पंखाशिवाय पर्याय नाही. घरोघरीच्या अन्नपूर्णांना आज आरोग्य ‘स्वयंपूर्णा’ होण्याचा संकल्प करायला मदत करूया. क्रांतीच्या स्वयंप्रकाशी ज्योती उजळूया...
- डॉ. मधुरा उदय कुलकर्णी
(लेखिका एम.डी. स्त्रीरोग प्रसूतितज्ज्ञ आणि मुंबई विद्यापीठ सुवर्णपदक प्राप्त आहेत.)