नवीन वर्षात आरोग्य व्यवस्था एका ‘क्लिकवर’; महापालिका, वैद्यकीय महाविद्यालये, डॉक्टरांचा समावेश
By संतोष आंधळे | Published: January 1, 2023 08:53 AM2023-01-01T08:53:40+5:302023-01-01T08:56:51+5:30
प्रत्येक नागरिकाची आरोग्याबद्दलची माहिती आता डिजिटल लॉकरमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. मुंबई महापालिकेचा आरोग्य विभागही यासाठी प्रयत्नशील आहे.
- संतोष आंधळे
मुंबई : नवीन वर्षात संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचे डिजिटायझेशन करण्याचे ध्येय केंद्रापासून ते राज्यातील आरोग्य यंत्रणेने राबविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे २०२३ या वर्षात गल्लीतील क्लिनिकपासून ते मोठ्या रुग्णालयापर्यंत रुग्णांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. यामध्ये आयुष्मान भारत डिजिटल मिशन या केंद्राच्या उपक्रमाची महत्त्वाची भूमिका आहे. प्रत्येक नागरिकाची आरोग्याबद्दलची माहिती आता डिजिटल लॉकरमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. मुंबई महापालिकेचा आरोग्य विभागही यासाठी प्रयत्नशील आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने यापूर्वीच राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न सर्व रुग्णालयांत काही दिवसांत व्यवस्था होणार आहे. त्याचप्रमाणे केंद्राच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणांतर्गत सर्व लहान रुग्णालयासाठी आणि वैयक्तिक डॉक्टरांसाठीसुद्धा छोट्या स्वरूपातील रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली बनविण्यात आली आहे. त्यामध्ये सहभाग घेण्याचे आवाहन सगळ्यांना करण्यात आले आहे. या छोट्या स्वरूपातील रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीत डॉक्टरांना त्यांच्या रुग्णांसाठी आयुष्मान भारत आरोग्य खाते उघडता येणार आहे.
डॉक्टरांना त्यांचे कॅलेंडर, अपॉइंटेन्टस आणि रुग्ण तपशील एकाच विंडोमध्ये ठेवण्यास शक्य होणार आहे. तसेच डॉक्टरांना नोंदणीकृत रुग्णांसाठी पूर्वीचे आरोग्याचे रेकॉर्ड आणि प्रिस्क्रिप्शन पाहण्याची आणि व्हिडीओवरून सल्लामसलत करण्याची व्यवस्था यामध्ये करण्यात आली आहे. डिजिटल प्रमाणित प्रिस्क्रिप्शन तयार करून ते रुग्णांना देण्याची व्यवस्था आहे. ४ जानेवारी रोजी यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. ज्यांना यामध्ये सहभागी व्हायचे आहे. त्यांना याठिकाणी https://abdm.nha.gov.in/docmit नोंदणी करणे शक्य होणार आहे.