Join us  

आरोग्य यंत्रणेला गोवरचा धसका, ‘त्या’ तीन मृत्यूंचे होणार ऑडिट, मुंबईत रुग्णसंख्येत वाढ

By संतोष आंधळे | Published: November 11, 2022 11:12 AM

गोवंडी परिसरात गेल्या महिनाभरात गोवर या आजाराचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्याची गंभीर दखल घेतली आहे.

मुंबई :

गोवंडी परिसरात गेल्या महिनाभरात गोवर या आजाराचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. तसेच या ठिकाणीच तीन लहान मुलांचा मृत्यू या आजारामुळे झाल्याचा संशय आहे. मात्र, त्यावर अजूनही शिक्कमोर्तब झालेले नाही. त्यामुळे हे मृत्यू नेमके कशामुळे हे शोधणे गरजेचे आहे. या तीनही मृत्यूंची कारणमीमांसा करण्यासाठी हे प्रकरण आरोग्य तज्ज्ञ समितीकडे पाठवणार असून त्यांच्या मृत्यूचे विश्लेषण करून घेणार आहे.   

ज्या तीन बालकांचा या ठिकाणी मृत्यू झाला त्यामध्ये,  सहरुन्निसा आणि अब्दुल रहीम खान या दाम्पत्याच्या दोन मुलांचा समावेश आहे. या दाम्पत्याला एकूण १० मुले असून त्यापैकी ५ मुले आणि ५ मुली आहेत. त्यापैकी नुरेन हा तीन वर्षाचा मुलगा आणि  हसनैन हा पाच वर्षांचा असून  या दोघा भावांचा मृत्यू या संशयित आजराने झाल्याचे बोलले जात आहे. तर १४ महिन्यांच्या फैझल अली खान या बाळाचा मृत्यू झाला आहे. या तीनही मुलाचा वैद्यकीय इतिहास पहिला, तर तिघांना सुद्धा ताप आणि पुरळ येत असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय त्यांना अन्य आजाराने ग्रासले होते. 

विशेष म्हणजे, या तीनही प्रकरणांत यांना गोवर झाल्याचे कुठेही निदान करण्यात आले नव्हते. त्यासाठी त्यांना मृत घोषित करणाऱ्या डॉक्टरांचा माहिती, घरातील सदस्यांची माहिती, शेजारी राहणाऱ्या नागरिकांची सर्व माहिती, त्या परिसरातील इतर डॉक्टरची माहिती गोळा करण्यात येणार आहे.

आम्ही हे तीन संशियत मृत्यू कशाने झाले याबाबतची सर्व माहिती गोळा करीत आहोत. संकलित माहिती तज्ज्ञ समितीकडे दिली जाईल आणि विश्लेषण केले जाणार आहे. त्यानंतर हे मृत्यू नेमके कशाने झाले यावर शिक्कामोर्तब होईल.- मंगला गोमारे, आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका

असे होते गोवराचे निदान... गोवर या आजाराचे निदान करण्यासाठी रक्त, लघवी आणि तोंडातून स्वॅब घेतला जातो  नमुने तपासणीसाठी हाफकिनच्या प्रयोग शाळेत पाठविले जातात. त्यानंतरच त्या आजाराचे निदान निश्चित केले जाते.  वरील तीनही मुलांच्या बाबतीत त्या प्रकारच्या कोणत्याही चाचणी केली गेलेली नव्हती. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका असा झाला हे शोधणे गरजेचे आहे.