Join us

आरोग्य व्यवस्था ‘सलाइनवर’; पालिका रुग्णालयातील ओपीडी बंद? रुग्णांचे हाल होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 6:14 AM

अध्यापक संघटनांनीसुद्धा आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे शनिवारी ओपीडीवर परिणाम होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याचा पाचवा दिवस असून, वैद्यकीय क्षेत्रातील इंटर डॉक्टर संघटनांनी पाठिंबा दिला आहे. महापालिकेच्या चार रुग्णालयांतील अध्यापक संघटनांनीसुद्धा आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे शनिवारी ओपीडीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महापालिका प्रशासनाने मात्र ओपीडी सुरूच राहणार असल्याचा दावा करून  २०० डॉक्टरांची कुमक उपगनगरीय रुग्णालय आणि आपला दवाखाना येथून उपलब्ध करून काम करणार असल्याचे सांगितले आहे. निवासी डॉक्टर आंदोलनावर गेल्यानंतर ओपीडी सेवेसोबत नियमित काम करण्याची जबाबदारी अध्यापक मंडळींनी सांभाळली होती. मात्र, त्यावेळी त्यांच्यासोबत इंटर्नस आणि बंधपत्रित डॉक्टर्स मदतीला होते. मात्र, शुक्रवारपासून इंटर्नस संघटनेने आणि बंधपत्रित डॉक्टर संघटनेनेसुद्धा निवासी डॉक्टरांना पाठिंबा दर्शवून काम बंद आंदोलनात सहभाग घेतल्याने रुग्णांना ओपीडीमध्ये सेवा देणे कठीण जात आहे.

  1. आयएमए सेवा बंद करणार- राष्ट्रीय पातळीवरील डॉक्टरांची शिखर संस्था इंडियन मेडिकल असोसिएशन यांनीसुद्धा पत्र काढून शनिवारी सकाळी  ६ वाजेपासून ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व दवाखाने बंद असणार असल्याचे सांगितले आहे. त्यासोबत अत्यावश्यक सेवा मात्र सुरूच राहणार आहे.
  2. परिचारिकांचा पाठिंबा- विविध रुग्णालयांतील परिचारिका निवासी डॉक्टरांच्या बंदमध्ये सामील होणार असल्याचे सांगत असल्या, तरी कोणत्याही परिचारिका संघटनेने अधिकृत पत्र काढलेले नाही. 
  3. रुग्णालयातील स्थिती- शुक्रवारी निवासी डॉक्टरांचा काम बंद आंदोलनाचा पाचवा दिवस असून, महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांत मोठ्या संख्येने ओपीडीमधील रुग्णांना नियमित उपचार दिले. केईएममध्ये ४८, नायरमध्ये ३ आणि  कूपरमध्ये ४ मोठ्या शास्त्रकिया करण्यात आल्या. नियोजित शास्त्रकिया रद्द केल्या आहेत.
  4. ओपीडी सेवा देणे शक्य नाही- शुक्रवारी महापालिका वैद्यकीय प्राध्यापक संघटनेने वैद्यकीय संचालकांच्या नावाने पत्र काढून ओपीडी सेवा देणे शक्य नसल्याचे सांगून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले आहे. चार प्रमुख रुग्णालयांत नायर, केईएम, कूपर आणि सायन रुग्णालयांचा समावेश येतो. मुंबईच्या विविध भागांतून हजारो रुग्ण नियमित उपचारासाठी येत असतात.
टॅग्स :मुंबईहॉस्पिटलडॉक्टरसंप