मुंबई : मुंबईसारख्या मेट्रो शहरांत आरोग्यसेवांची उपलब्धता सुलभ असणे महत्त्वाचे आहे. मात्र अजूनही या शहरातील काही भागांत आरोग्य यंत्रणाच ‘व्हेंटिलेटर’वर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गोवंडी येथील स्थानिकांना आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ व्यवस्थापनाला बळी पडावे लागत आहे. त्यामुळे गोवंडी परिसरातील डम्पिंग ग्राउंडनजीक झोपडपट्ट्यांमधील स्थानिक आरोग्यसेवेपासून वंचित असल्याचे दिसत आहे.या संस्थेच्या अहवालानुसार, गोवंडी येथे ६० दवाखान्यांची गरज असताना केवळ नऊच दवाखाने आहेत़ येत्या काही महिन्यांत आणखी तीन दवाखाने सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. एकूण १५ आरोग्यसेवा अधिकाºयांच्या जागा भरल्या असून, आणखी पाच जागांची गरज आहे. दुसरी धक्कादायक बाब म्हणजे या परिसरात एकही रुग्णालय नसल्याचे समोर आले आहे. या परिसरात केवळ एकच प्रसूतिगृह असून, अन्य दोघांचे अजूनही बांधकाम सुरू आहे. येथे एकही खासगी नर्सिंग होम नसल्याचे अहवालात नमूद केले आहे.गोवंडीतील ७ झोपडपट्टीमध्ये ‘अपनालय’ या संस्थेने गेल्या महिन्यात एक सर्वेक्षण केले. शिवाजी नगर, रफी नगर, साई नगर, निरंकारी नगर, बुद्ध नगर, शांती नगर, इंदिरा नगर आणि आदर्श नगर या झोपडपट्टीच्या आणि डम्पिंग ग्राउंडच्या शेजारी राहणाºयांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात येथील स्थानिकांचे सरासरी मृत्यूचे वय ३९ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली़ अपनालय संस्थेचे निनाद साळुंखे यांनी सांगितले की, या परिसरातील आरोग्यसेवाविषयीच्या महत्त्वाच्या गरजा पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यात आल्या आहेत. भविष्यात पालिकेसोबत या परिसरात काम करण्यात येईल. येथील आरोग्यसेवांच्या सहज सुलभ उपलब्धतेसाठी मूलभूत गरजांच्या परिपूर्णतेवर भर देण्यात येईल.
आरोग्य यंत्रणाच ‘व्हेंटिलेटर’वर, गोवंडीतील प्रकार, ६० दवाखान्यांची आवश्यकता, प्रत्यक्षात ९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 2:37 AM