- डॉ. मंगेश पाटे(बालरोगतज्ज्ञ)गोवर हा पूर्वीच्याकाळी असलेला सर्वसाधारण आजार आहे. गोवरचा उद्रेक यापूर्वी एक ते दोन दशकांपूर्वीही झालेला आहे. मात्र गोवराची लस घेतल्याने प्रतिबंध होणारा हा आजार आहे. ज्या बालकांनी या लसीचे दोन डोस ठरवून दिलेल्या वेळेत घेतले आहे त्यांना आजार होण्याची शक्यता कमी असते, होणारच नाही याची हमी देता येत नाही. ३ टक्के बालकांना लस घेतल्यानंतरही हा आजार होऊ शकतो. त्या मुलामध्ये त्या लसीमुळे या आजाराच्या विरुद्ध लढण्याची प्रतिकार शक्ती निर्माण होत नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा आजार होण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे ज्या मुलांनी लस घेतलीच नाही किंवा एकच डोस घेतला अशा मुलांना हा विषाणूजन्य आजार होण्याची शक्यता असते.
या आजाराची सुरुवात बारीक तापाने होते. त्यानंतर हळूहळू ताप वाढू लागतो. काही दिवसाने अंगावर लाल दाण्यासारखे पुरळ येऊ लागतात. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातच या आजाराकडे लक्ष दिले तर हा आजार सहजपणे बरा होणार आहे. मात्र ते दुखणे अंगावर काढले आणि कोणत्याही प्रकारचे उपचारच केले नाही तर हा आजार गंभीर होऊ शकतो. १००० गोवरचे निदान झालेल्या मुलांमध्ये २ ते ३ गंभीर होऊ शकतात. त्यांना श्वासनाच्या व्याधी निर्माण होऊ शकतात. मेंदूचे विकार होऊ शकतात. त्यामुळे लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे गेलेले केव्हाही उत्तम असते.
या आजराचे निदान झाल्यास त्या मुलांना शाळेत पाठवू नये. कारण हा आजार वेगाने प्रसार करणारा आहे. जर वेगळी एखादी खोली असेल तर त्याला तेथे ठेवावे भरपूर विश्रांती करायला लावणे. बहुतांशवेळा ही मुले लहान असतात. त्यामुळे यांना एकट्याला खोलीत ठेवणे शक्य नसते. प्रौढांना या आजाराचा फारसा धोका नसतो. दुसऱ्या मुलांमध्ये मिसळू देऊ नये. या आजाराची उपचारपद्धतीची संपूर्ण माहिती डॉक्टरांना असते कारण त्याच्या प्रॅक्टिसमध्ये गोवरचे रुग्ण पाहिलेले असतात. अमेरिकेत २२ वर्षांपासून तो देश गोवरमुक्त असल्याचे सांगत आहे. मात्र अजूनतरी आपल्याकडे तशी परिस्थिती नाही. मात्र गोवर निर्मूलनाच्या दिशेने आपल्याला ठोस पावले टाकावीच लागणार आहे.
गोवरच्या उद्रेकाला आळा घालायचा असेल तर लसीकरणावर भर दिला पाहिजे. नागरिकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. या आजराचे धोके त्यांना समजावून सांगितले पाहिजे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांनीही आपल्या दवाखान्यात, रुग्णालयात आणि नर्सिंग होममध्ये या आजाराच्या माहितीो पोस्टर्स लावले पाहिजेत. प्रशासनाने शाळांना या आजराबाबतीत अवगत केले पाहिजे.