Health: दुर्मीळ आजार; कोणी फुप्फुस दान करेल का..?, प्राजक्ताला हवाय मोकळा श्वास!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 11:18 AM2022-06-20T11:18:24+5:302022-06-20T11:18:53+5:30
Crime News: गेली कित्येक वर्षे आपल्याकडे असेही काही नागरिक आहेत, ज्यांना श्वास घेण्यासाठी वर्षानुवर्षे दिवसरात्र ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नावाच्या यंत्रावर अवलंबून राहावे लागत आहे. पुण्यात बँकेत काम करणारी प्राजक्ता दुगम हे त्याचेच एक उदाहरण. त्यांच्या सोबतीला हे यंत्र ७ वर्षांपासून आहे.
- संतोष आंधळे
मुंबई : जगण्याचा संघर्ष माणसाला काय करायला लावेल कधीच कळत नाही. कोरोना काळात ऑक्सिजनची गरज पडू लागली तेव्हा सामान्य नागरिकांना फुप्फुसाचे महत्त्व लक्षात आले. गेली कित्येक वर्षे आपल्याकडे असेही काही नागरिक आहेत, ज्यांना श्वास घेण्यासाठी वर्षानुवर्षे दिवसरात्र ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नावाच्या यंत्रावर अवलंबून राहावे लागत आहे. पुण्यात बँकेत काम करणारी प्राजक्ता दुगम हे त्याचेच एक उदाहरण. त्यांच्या सोबतीला हे यंत्र ७ वर्षांपासून आहे.
याच यंत्राद्वारे दिवसातील १६-१७ तास श्वास घ्यावा लागतो. प्राजक्ताला फुप्फुसाचा दुर्मीळ आजार झाला असून तिचे फुप्फुस निकामी झाले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला नवीन ‘फुप्फुसाची’ गरज असून त्याची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.
प्राजक्ताच्या फुप्फुसांना छिद्र असल्याच्या (लिंफॅजिओलेओमेटासिस) दुर्मीळ आजाराचे निदान डॉक्टरांनी केले. या आजारामुळे तिला स्वत:हून श्वास घेणे शक्य नव्हते. त्यामुळे तिला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर या यंत्राचा वापर करण्यास सांगितले.
स्वत:हून मोकळा श्वास घ्यायचाय...
मला यंत्राचा वापर न करता स्वत:हून मोकळा श्वास घ्यायचाय... माझे घर आणि ऑफिस या ठिकाणी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवावे लागतात. त्याच्या साहाय्याने मी श्वास घेत असते. बँकेतील सहकाऱ्यांची प्रचंड मदत होते. फुप्फुसाचे दुखणे वाढल्याने हृदयावर ताण येऊ लागला आहे. हृदयाचे दुखणे चालू झाले असून आता दोघांचेही प्रत्यारोपण करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे. - प्राजक्ता दुगम, आजाराने त्रस्त रुग्ण
राज्यात ३६ रुग्णांना हवे आहे फुप्फुस
मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात, केंद्र शासनाचे राज्य अवयव आणि उती पेशी प्रत्यारोपण संस्था कार्यालय आहे. (स्टेट ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन : सोटो) हे कार्यालय राज्यातील अवयवदान नियमनाच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवते. या संस्थेच्या आकडेवारीनुसार ३१ मे अखेरीस राज्यात ३६ रुग्ण फुप्फुसाच्या प्रतीक्षेत आहेत.
ऑक्सिजनची पातळी (एस.पी.ओ.टू.) ९५ खाली गेली तर आपल्याकडे तत्काळ पावले उचलली जातात. मात्र प्राजक्ताचा आजार लक्षात घेता तिची पातळी ३५ पर्यंत आली होती म्हणून तिला श्वास घेण्यासाठी पूर्णवेळ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर या यंत्राची मदत घ्यावी लागत आहे. आता हृदयावर अतिरिक्त ताण असल्यामुळे दोन्ही अवयवांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला आहे.
- प्रा. डॉ. तुषार सहस्रबुद्धे, डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्र, श्वसनविकार विभाग