लसीकरणात आरोग्य कर्मचारी आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 02:46 AM2021-02-10T02:46:48+5:302021-02-10T02:47:01+5:30

दुसरा टप्पा; सव्वा लाख फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे उद्दिष्ट

Health workers lead in vaccination | लसीकरणात आरोग्य कर्मचारी आघाडीवर

लसीकरणात आरोग्य कर्मचारी आघाडीवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात मुंबई उपनगर लसीकरणात आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. सध्या राज्यासह शहर, उपनगरात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मुंबईत १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणात आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. तर दुसरीकडे फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांकडून अजूनही लसीकरण प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले आहे. 
मुंबई शहरात आतापर्यंत २४,६४२ आरोग्य कर्मचाऱ्यांना तर १,३३० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. उपनगरात ४९,७२० आरोग्य कर्मचारी आणि ३,५४८ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले. एकूण प्रतिसाद पाहता फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांमध्ये लस घेण्याबाबत उदासीनता असल्याचे दिसून येते. मुंबईत एकूण ७९,२४० लाभार्थ्यांनी लस घेतल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. 

दुसऱ्या टप्प्यात पालिका कर्मचारी, रेल्वे, बेस्ट कर्मचारी यांचे लसीकरण शुक्रवारपासून सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लसीकरणाला अधिक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी लस घेण्यास फारसे पुढे येत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी अत्यावश्यक सेवेतील १,७५२  कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे नियोजन होते. मात्र यातील ७५३ जणांनीच लस घेतली. शनिवारी  प्रतिसाद थोडा वाढला. ३३९० पैकी २५०७ कर्मचाऱ्यांनी लस घेतली. याउलट आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण दोन्ही दिवशी उद्दिष्टाच्या जवळपास ८० टक्के झाले. लसीच्या परिणामकतेबाबतची साशंकता आणि गैरसमज यामुळे या कर्मचाऱ्यांकडून अजून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी, उद्दिष्टापेक्षा लसीकरणाचे प्रमाण कमी नोंदले जात आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणात सव्वा लाख फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस देण्याचे पालिका प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.

दुष्परिणाम होत नाहीत
दाेन्ही लसींचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, त्याची काळजी सरकार घेणार आहे. लसीकरण झाल्याशिवाय कोरोनाला आळा बसणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे. कोरोनाचे मृत्यू टाळण्यासाठी लसीकरण अतिशय गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद वाढविण्यासाठी विभागप्रमुख किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये जनजागृती करून त्यांना पुढाकार घेण्यास सांगितले पाहिजे. जेणेकरून, त्यानंतर कर्मचाऱ्यांमधील लसीबाबतचे गैरसमज दूर होऊन विश्वासार्हता निर्माण होण्यास मदत होईल.
- डॉ. अविनाश भोंडवे,
इंडियन मेडिकल
असोसिएशनचे माजी अध्यक्ष

Web Title: Health workers lead in vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.