आरोग्यसेवा महागली! मुंबईकरांसाठी २० टक्क्यांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 07:28 AM2018-02-03T07:28:38+5:302018-02-03T07:28:50+5:30

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात आरोग्यसेवा क्षेत्रासाठी सर्वांत मोठी अशी योजना गुरुवारी जाहीर झाल्यानंतर पालिकेच्या अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांचे लक्ष लागले होते. मात्र, पालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्यसेवा क्षेत्राचे दर एकूण ५० टक्क्यांनी महागल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना उपचारांसाठी २० टक्के वाढीव दर, तर मुंबईबाहेरील रुग्णांना ३० टक्के वाढीव दर मोजावे लागणार असल्याचे दिसून येते आहे.

 Healthcare is expensive! 20 per cent increase for Mumbaiites | आरोग्यसेवा महागली! मुंबईकरांसाठी २० टक्क्यांची वाढ

आरोग्यसेवा महागली! मुंबईकरांसाठी २० टक्क्यांची वाढ

googlenewsNext

मुंबई : केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात आरोग्यसेवा क्षेत्रासाठी सर्वांत मोठी अशी योजना गुरुवारी जाहीर झाल्यानंतर पालिकेच्या अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांचे लक्ष लागले होते. मात्र, पालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्यसेवा क्षेत्राचे दर एकूण ५० टक्क्यांनी महागल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना उपचारांसाठी २० टक्के वाढीव दर, तर मुंबईबाहेरील रुग्णांना ३० टक्के वाढीव दर मोजावे लागणार असल्याचे दिसून येते आहे.
महानगरपालिकेच्या आरोग्यविषयक सुविधांचे दर २००१पासून सुधारित करण्यात आलेले नव्हते. यामुळे मुंबईतील रहिवाशांसाठी वैद्यकीय सेवांच्या दरात अंदाजे २० टक्के इतकी वाढ प्रस्तावित आहे. मुंबईबाहेरील रहिवाशांसाठी दरात ३० टक्केपर्यंत वाढ प्रस्तावित आहे. तथापि, ज्येष्ठ नागरिकांना पूर्वीप्रमाणेच मोफत उपचार देण्यात येतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. शहर - उपनगरातील ३ आरोग्य केंद्रे, २५ दवाखाने व ५ प्रसूतिगृहांच्या दर्जोन्नतीचे काम यंदा हाती घेण्यात आले आहे. याकरिता ५०.७० कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे. अतिविशेष वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत महापालिकेने कार्यवाही केली आहे. १० उपनगरीय रुग्णालयांमधील औषधे, सामग्री, डिस्पोझेबल्स यांच्या अनुसूचीचे आणि मनुष्यबळ यांचेदेखील मानकीकरण करण्यात येईल. याकरिता ६१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. २०१८-१९मध्ये प्रमाणित स्वरूपानुसार २५ दवाखाने दुरुस्तीकरिता निश्चित करण्यात आले आहेत. संसर्गजन्य रोग तसेच मधुमेह, उच्चरक्तदाब इ. असंसर्गजन्य रोगांसाठी आवश्यक असलेल्या उपकरणांनी दवाखाने सुसज्ज केले जातील. याकरिता २०१८-१९च्या अर्थसंकल्पीय अंदाजात १.०५ कोटींची तरतूद आहे.
नायरचा ३४० कोटींचा पुनर्विकास प्रकल्प
नायर रुग्णालयाची ३४० कोटी रुपयांची पुनर्विकासाची योजनादेखील सुरू आहे. यात पायाभूत विकासकामामध्ये तळमजला अधिक नऊ मजली लिनिअर एॅक्सिलेट इमारत, एल आकारातील तळमजला अधिक १० मजली इमारत, तसेच ईएमएस, आरएमओ क्वार्टर्स इमारत यांचा समावेश आहे. यंदाच्या वर्षी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, त्याकरिता चार कोटींची तरतूद करण्यात येत आहे.
नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या विद्यमान इमारतीच्या नूतनीकरणाचे काम प्रगतिपथावर असून ते जुलै २०१८पर्यंत पूर्ण होईल. ११ मजली नवीन इमारत बांधण्याचे योजिले असून त्याचे काम २०१८च्या सुरुवातीसच सुरू होईल. मागील वर्षात दंत महाविद्यालयात १०० नवीन इलेक्ट्रीकली आॅपरेटेड डेंटल चेअर्स खरेदी करण्यात आल्या. त्याचप्रमाणे, ओरल कॅन्सर स्क्रीनिंग अ‍ॅण्ड डिटेक्शन सेंटरदेखील सुरू करण्यात आले आहे.

सुसज्ज अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे

यंदाच्या वर्षी ३० कोटी किमतीची नऊ नवीन मॉड्युलर आॅपरेशन थिएटर्स कार्यान्वित करण्यात आली आहेत. केईएम, नायर, कूपर रुग्णालयांसाठी नवीन डिजिटल सबस्ट्रॅक्शन एंजियोग्राफी (डीएसए) मशीन खरेदी करण्यासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. केईएम, सायन व कूपरमध्ये कॅथलॅब उभारणीसाठी १२ कोटी मंजूर करण्यात आले आहेत.
पालिकेच्या रुग्णालयांमध्ये अतिदक्षता व व्हेंटिलेटर रुग्णक्षय्येची क्षमता वाढविण्यासाठी १६ कोटी इतक्या रकमेने २३० व्हेंटिलेटर्सच्या खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. २०१८मध्ये व्हेंटिलेटर्स सर्व प्रमुख रुग्णालये व उपनगरीय रुग्णालयांना उपलब्ध होतील. रुग्णालयांतील जैव वैद्यकीय उपकरणांचे मॅपिंग करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी महत्त्वाचे पाऊल
केंद्र सरकारने २०२५पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे घोषित केले आहे. त्यादृष्टीने उपाययोजना म्हणून पोषक आहार, रुग्ण प्रतिबंधक किट, पेडीयाट्रीक डी.आर.टी.बी. सेंटर, कल्चर डी.एस.टी. लॅब, १० रुग्णशय्या असलेले आय.आर.सी.यू. प्रस्तावित आहेत. २०१८-१९च्या अर्थसंकल्पात १३.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मनुष्यबळ वाढविणार
सर्व रुग्णालयांतील परिचारिकांची ५८२ नवीन व रिक्त पदे भरण्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. तसेच, उपनगरीय रुग्णालयांतील वैद्यकीय उपचार सुविधांच्या सक्षमीकरणासाठी २०१८मध्ये पदव्युत्तर वैद्यकीय अधिकाºयांची २७४ पदे भरण्यात येतील. रुग्णांसाठी डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या यांच्या गुणोत्तर प्रमाणात सुधारणा करण्याचे योजिले आहे.

वैद्यकीय सेवांचे बळकटीकरण
रुग्णालयातील वैद्यकीय सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी पालिकेने रुग्णालयातील स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत बाबींच्या परिरक्षणासाठी ‘फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस’ उपलब्ध करून वैद्यकीय सेवांचे बळकटीकरण करण्याचे योजिले आहे. यामुळे रुग्णालयातील पायाभूत सुविधांचे परिरक्षण होईल आणि उत्तम, सुस्थितीतील रुग्णालये उपलब्ध करून देण्यास मदत होईल. २०१८-१९च्या अर्थसंकल्पात १.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
मागाठाणे येथील कनकिया कॉम्प्लेक्स येथे पालिकेतर्फे लोकमान्य टिळक केंद्र सुरू करण्यात आले आहे. अशा पद्धतीचे भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील हे एकमेव केंद्र आहे. या केंद्रात १५ रुग्णशय्यांचा पीडीयाट्रीक हिमॅटो-आॅन्कोलॉजी कक्ष, २२ रुग्णशय्यांचा डे केअर ट्रासफ्युजन सेंटर, सहा रुग्णशय्यांचा केमोथेरपी डे केअर कक्ष कार्यान्वित झालेला आहे. .

अर्ली इंटरव्हेंशन सेंटरची निर्मिती
विशेष मुलांकरिता बेलासिस रोड, नागपाडा येथे नायर रुग्णालयाच्या मार्गदर्शनाखाली ‘अर्ली इंटरव्हेंशन सेंटर’ प्रस्तावित आहे. या सेंटरकरिता १ कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासाकरिता त्यांची सर्वंकष काळजी घेण्यासाठी यामुळे मदत होईल. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जन्मजात व्यंग, वाढ खुंटणे, कमतरता, रोग या अनुषंगाने तपासणी केलेल्या बालकांना गरज आणि आवश्यकतेनुसार पाठविण्यात येईल.

वसतिगृहांची उभारणी
टाटा कम्पाउंड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाकरिता वसतिगृहाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. तसेच केईएम, लोकमान्य टिळक व नायर रुग्णालयासाठी अ‍ॅक्वर्थ कुष्ठरोग रुग्णालयाचे आवार, सायन कोळीवाडा आणि हाजीअली येथे वसतिगृह बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. याकरिता १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

स्मशानभूमींचा दर्जा सुधारणार
नऊ स्मशानभूमींची दर्जोन्नती करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच, शहर-उपनगरातील १२ स्मशानभूमींचे पीएनजी स्मशानभूमीमध्ये रूपांतर करण्याचे प्रस्तावित आहे. याकरिता २०.६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title:  Healthcare is expensive! 20 per cent increase for Mumbaiites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.