आरोग्य कर्मचारी ५ महिने पगाराविना
By admin | Published: September 13, 2014 01:03 AM2014-09-13T01:03:04+5:302014-09-13T01:03:04+5:30
वसई तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत खाजगी तत्त्वावर कार्यरत असलेल्या डेटा आॅपरेटरचा पाच महिन्यांपासून पगार झाला नसल्यामुळे त्यांना हलाखीच्या परिस्थितीचा सामना
पारोळ : वसई तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत खाजगी तत्त्वावर कार्यरत असलेल्या डेटा आॅपरेटरचा पाच महिन्यांपासून पगार झाला नसल्यामुळे त्यांना हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
आरोग्य केंद्राचा कारभार सुव्यवस्थित होण्यासाठी खाजगी ईगल कंपनीकडून पारोळ, भाताणे, आगाशी, निर्मळ इ. प्राथमिक आरोग्य केंद्रांत डेटा आॅपरेटरची प्रशासनाने भरती केली. एप्रिलमध्ये भरती केल्यानंतर त्यांना त्या वेळी त्यांचा पगारही ठरवण्यात आला आणि तुमचा पगार तुमच्या बँकेच्या खात्यावर पडेल, असे सांगून त्यांची इंडुस बँकेमध्ये खातीही उघडण्यात आली. पण, आज त्यांच्या नेमणुकीला पाच महिने होऊनही त्यांचे पगार झालेले नाहीत. त्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच आरोग्य केंद्रांचे मुंबईतील कार्यालय त्यांच्याही पगारासाठी या सर्व कर्मचाऱ्यांनी फेऱ्या मारल्या, पण कुणीही याची दाद घेतली नाही किंवा नेमणूक करणाऱ्या ईगल कंपनीला जाब विचारला नाही.
पाच महिने झाले तरी आमचा पगार न झाल्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचण येत असून पैसे नसल्यामुळे आरोग्य केंद्रावर जाण्यासाठी प्रवासभाडेही आता आमच्याकडे राहिले नाही. त्याचप्रमाणे आम्हाला इतर कामांसाठी पंचायत समितीच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. तरी, आरोग्य प्रशासनाने याची दखल घेणे आवश्यक आहे.