आरोग्यासाठी फटाके घातक

By admin | Published: November 2, 2015 02:35 AM2015-11-02T02:35:33+5:302015-11-02T02:35:33+5:30

दिवाळीत मोठ्या प्रमाणावर आतशबाजी करून लोकांना बहिरे करणाऱ्या फटाक्यांमधील रसायनांबाबतही आता धोक्याची घंटा देण्यात आली आहे

Healthy crackers are dangerous | आरोग्यासाठी फटाके घातक

आरोग्यासाठी फटाके घातक

Next

मुंबई : दिवाळीत मोठ्या प्रमाणावर आतशबाजी करून लोकांना बहिरे करणाऱ्या फटाक्यांमधील रसायनांबाबतही आता धोक्याची घंटा देण्यात आली आहे. या फटाक्यांमध्ये पारा, शिसे, गंधक (सल्फर) आणि कार्बनचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रमाण ‘आवाजा’एवढेच घातक असल्याचा निष्कर्ष ‘आवाज फाउंडेशन’ने काढला आहे. यावरील कारवाईसाठी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना निवेदन पाठवण्यात आले
आहे. जीवघेणे फटाके वाजवू नयेत, असे आवाहनही मुंबईकरांना करण्यात आले आहे.
गेल्या १० वर्षांत मुंबई आणि उपनगरात दिवाळीत मोठ्या प्रमाणावर आतशबाजी झाल्याने ध्वनी आणि वायू प्रदूषित झाल्याचे अनेक दाखले आहेत. ऐन दिवाळीत वातावरणातील प्रदूषणाचा स्तर वाढून मुंबईकरांना त्रास झाल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. यावर स्वयंसेवी संस्थासह महाराष्ट्र नियंत्रण प्रदूषण मंडळाने जनजागृती केल्यानंतर गेल्या तीन वर्षांत यावर काहीशी मर्यादा आली आहे. परंतु, तरीही फटाक्यांतील घातक रसायनांमुळे मुंबईकरांना त्रास होऊ नये, म्हणून याबाबत आता अधिकाधिक जागृती सुरू झाली
आहे.
‘आवाज फाउंडेशन’सह महाराष्ट्र नियंत्रण प्रदूषण मंडळाने फटक्यांच्या आवाजाची तीव्रता मोजली. यातील निष्कर्षानंतर लक्ष्मी बॉम्ब, अ‍ॅटम बॉम्ब आणि थंडर बॉम्ब अधिक आवाजाचे असल्याचे नमूद केले आहे. तिन्ही बॉम्बचा आवाज अनुक्रमे ११४, १०८, ११३ डेसिबल एवढा नोंदविण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे फटाक्यांतील रासायनिक घटकांचा विचार करता त्यांचेही प्रमाण अधिक असल्याने ते घातक ठरण्याचीच शक्यता फाउंडेशनने व्यक्त केली आहे.
दिवाळीतील आवाज आणि रासायनिक प्रदूषण कमी असावे म्हणून ‘आवाज’च्या सर्वेसर्वा सुमेरा अब्दुल अली यांनी यासंदर्भात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रवजा निवेदन पाठवले आहे. फटाक्यांमध्ये रसायनांचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
रसायनांमध्ये पारा, शिसे, गंधक (सल्फर) आणि कार्बन यांचा क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात समावेश आहे. हे लहान मुलांना घातक असल्याची भीती त्यांनी वर्तवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही पारा आणि शिसे यांना घातक रसायनांच्या यादीत पहिल्या १० क्रमांकांत टाकल्याचे सुमेरा यांनी म्हटले आहे.
नागरी वस्तीत अशा रसायनांचे प्रदूषण घातक असल्याने याबाबत कठोर कारवाईची विनंती फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Healthy crackers are dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.