निरोगी मानसिक आरोग्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:09 AM2021-03-13T04:09:28+5:302021-03-13T04:09:28+5:30
................. एकुलती एक मुलं, अगदी बहीण, भाऊ असतील तरी स्वत:ला एकलकोंडी बनविणारी कुमारवयातील मानसिकता, घरातील परस्पर नातेसंबंधांमधील दुरावा, हेवे-दावे, ...
.................
एकुलती एक मुलं, अगदी बहीण, भाऊ असतील तरी स्वत:ला एकलकोंडी बनविणारी कुमारवयातील मानसिकता, घरातील परस्पर नातेसंबंधांमधील दुरावा, हेवे-दावे, मनाविरुद्ध घडले की आकांडतांडव करून, दमदाटी करून आपल्या मनासारखेच करून घेण्याची मुलांची धडपड! हे सगळे जरा जास्त प्रमाणात वाढल्याचे आम्ही आमच्या नित्य प्रॅक्टीसमध्ये बघत असतो. वेळप्रसंगी पालकांना किंवा मुलांना योग्य असे समुपदेशन करत असतो. आई-वडिलांमधील टोकाचे भांडण, व्यसनाधिनता, ताणतणाव यासारखी काही प्रतिकूल परिस्थिती मुलांमध्ये अतिचिंता व नैराश्याची नकारात्मक भावना वाढवू शकते.
अमेरिकेत नुकत्याच केलेल्या मानसशास्त्रीय संशोधनामध्ये एकटेपणाची भावना ही भुकेच्या व तहानेच्या जाणिवेइतकी प्रखर असते; व ती पूर्ण झाली नाही, तर शारीरिक व मानसिक परिणामांना सामोरे जावे लागते, असा निष्कर्ष काढण्यात आला. लोकांबरोबर बोलण्याची गरज ही अन्न ग्रहण करण्याइतकी नैसर्गिक व मूलभूत असते. Massachusetts मधील मानसशास्त्र विभागाने या covid-19 च्या प्रादुर्भावात हा अभ्यास केला.
एकटेपणाची भावना सोसत असलेली काही लोकं व मुद्दाम काही तास भुकेले व तहानलेले काही लोकं, यांच्या मेंदूमधील रासायनिक बदल हे त्यांनी functional MRI च्या साहाय्याने नोंदवले. मेंदूतील substantia nigra, जे dopamine ची पातळी निर्मिते यात कमालीची कमी पातळी दिसली. त्यामुळे स्वयंप्रेरणेवर याचा विपरीत परिणाम आढळला, व नैराश्याची भावना जाणविण्याचे प्रमाण या लोकांमध्ये आढळले. तात्पर्य एवढेच की, असा एकाकीपणा वाटत असेल तर कुटुंबातील लोकांनी, नातेवाइकांनी, मित्रमंडळींनी या एकटं पडलेल्या मनांची कारणे समजून घेऊन त्यातून बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तीला मदत केली पाहिजे. त्या व्यक्तीचे विचार, धारणा जर न्यूनगंड किंवा अहंगंडधारी असतील तर त्या धारणांना हळूहळू बदलले पाहिजे. जर हे जमत नसेल तर मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्यास कमीपणा मानू नये. भावनिक बुद्धिमत्तेचे विकसन करणारे अनेक छंद जोपासले पाहिजेत. स्वत:च्या भावना ओळखून, त्यांची तीव्रता, वारंवारता व कालावधी समजून घेणे गरजेचे आहे. कृती व त्याचा परिणाम याची तर्कशुद्ध साखळी डोक्यात येणे व त्याप्रमाणे आधी विचार करून कृती करणे फायद्याचे ठरते.
जपानमध्ये तर एकाकीपणाचा विचार करून चक्क एका मंत्रालयाची नियुक्त करण्यात आली आहे. आपल्याकडेदेखील फोनच्या माध्यमातून अनेक हेल्पलाइन आहेत. राग, नैराश्य, चिंता, मत्सर यासारख्या नकारात्मक भावना योग्य पद्धतीने व्यक्त करता याव्यात यासाठी कुटुंबात मोकळा संवाद पाहिजे. कित्येकदा कुटुंब कार्यशाळा किंवा कुटुंबातील सगळ्या सदस्यांना घेऊन केलेले समुपदेशन व्यक्तीच्या विचार, भावना व वर्तन या त्रिकोनात निरोगी व सकारात्मक बदल घडवून आणतात हे आम्ही बघत असतो. फक्त बदल महत्त्वाचा!
- मानसी