Join us

‘हर्ड इम्युनिटी’ ही तर दुधारी तलवार, प्रयोग करावा याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 4:39 AM

‘हर्ड इम्युनिटी’चा पर्याय स्वीकारता येईल का, याबाबतचा खल सुरू आहे.

संदीप शिंदे मुंबई : अर्थव्यवस्थेचे ४० दिवसांच्या लॉकडाउनमुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कोरोनावर मात करणारी लसही पुढील पाच ते सहा महिने दृष्टिपथात नाही. त्या परिस्थितीत ‘हर्ड इम्युनिटी’चा प्रयोग करावा का याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. परंतु, हा प्रयोग दुधारी तलवारीसारखा आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी आपल्या संबोधनात या पर्यायाचा ओझरता उल्लेख करून तो धोका पत्करण्याची तयारी नसल्याचेही संकेत दिले.संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त लोकांना झाल्यानंतर त्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. त्या प्रतिकाराच्या जोरावर रुग्ण आजारावर मात करू शकतो. त्याला ‘हर्ड इम्युनिटी’ म्हणतात. या ‘इम्युनिटी’मुळे रोगाला ओळखणारी आणि प्रतिबंध करणारी शक्ती (अ‍ॅण्टी बॉडी) शरीरात विकसित होते. त्यामुळे पुन्हा या रोगाची लागण झाली तरी त्याचे दुष्परिणाम कमी होतात. त्यामुळे ‘हर्ड इम्युनिटी’चा पर्याय स्वीकारता येईल का, याबाबतचा खल सुरू आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात सुरू असताना ब्रिटनने लॉकडाउन किंवा सोशल डिस्टन्सिंंगवर भर न देता ‘हर्ड इम्युनिटी’चा पर्याय स्वीकारला होता. मात्र, त्यामुळे या देशात आता हाहाकार उडाला आहे. या देशात सुमारे दीड लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून २० हजारांवर बळी गेले आहेत, याकडे दुर्लक्ष करता येत नाही.लॉकडाउन किंंवा सोशल डिस्टन्सिंंगचे निर्बंध न ठेवता देशातील ७० ते ८० टक्के लोकांना या रोगाची लागण होऊ दिली तर त्यातील बहुसंख्य नागरिक हर्ड इम्युनिटीच्या बळावर कोरोनाला हरवतील, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. परंतु, भारताची लोकसंख्या आणि इथल्या आरोग्य यंत्रणांची सज्जता पाहता हा प्रयोग धोकादायक ठरू शकतो, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.>‘हर्ड इम्युनिटी’चा धोका पत्करावा लागेलदोन टप्प्यांत २१ आणि १३ दिवसांचे लॉकडाउन आणि त्या दरम्यान सात-सात दिवसांची सूट असा कोरोनाचा सामना करण्याचा प्रोटोकॉल सुरुवातीला ठरला होता. या सात दिवसांच्या काळात रोगाचा मर्यादित स्वरूपात फैलाव आणि हर्ड इम्युनिटीचा विकास होऊ देण्याचे नियोजन होते. मात्र, त्यात बदल करून सलग लॉकडाउन करण्यात आले. परंतु, जेव्हा केव्हा लॉकडाउन संपेल आणि लोक घराबाहेर पडतील तेव्हा या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. तेव्हा हर्ड इम्युनिटीच्या जोरावरच या आजारावर मात करावी लागेल. तसेच लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत ‘हर्ड इम्युनिटी’चा पर्याय स्वीकारावा लागेल असेच चित्र दिसत आहे. - डॉ. विनायक जोशी, न्युरो सर्जन, डिव्हाइन हॉस्पिटल>भारतासाठी जमेची बाबइंग्लंडमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ८० टक्के रुग्णांचे वय हे ६० वर्षांपेक्षा जास्त आहे. भारतात मात्र तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच, देशातील नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती जास्त आहे. त्यामुळे ‘हर्ड इम्युनिटी’बाबत भारतीयांसाठी या जमेच्या बाजू म्हणता येतील.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस