मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टरांनी केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने मंगळवारी एक आठवड्यासाठी तहकूब केली. आरोपी डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहरे व डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्या. डी.एस. नायडू यांच्या एकसदस्यीय खंडपीठापुढे होती.
पोलिसांनी आरोपींविरुद्ध सादर केलेले दोषारोपपत्र मराठीत असल्याने ते आपल्याला समजत नाही. त्यामुळे या दोषारोपपत्राचे इंग्रजीत भाषांतर करण्याचे निर्देश तपास यंत्रणेला द्यावेत, अशी विनंती आरोपींचे वकील आबाद पौडा यांनी न्यायालयाला केली. २३ जुलै रोजी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध पहिले दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. आरोपींच्या वकिलांनी वेळ मागितल्याने उच्च न्यायालयाने या जामीन अर्जांवरील सुनावणी एक आठवडा तहकूब केली. गेल्या सुनावणीत न्यायालयाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (हिंसाचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचा आदेश दिला होता.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, भिल जमातीची पायल तडवी डॉक्टर होण्याकरिता नायर रुग्णालयामध्ये शिकत होती. मात्र, तिथे तिच्या वरिष्ठ डॉक्टरांनी तिच्यावर जातिवाचक टिप्पणी केली. तसेच तिचा सतत अपमान केला. या मानसिक त्रासाला कंटाळून २२ मे रोजी पायलने नायर रुग्णालयाच्या हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली.