आयपीएस अधिकाऱ्यांच्या सुटकेच्या अपिलावर २२ मार्चला सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 04:57 AM2018-03-16T04:57:59+5:302018-03-16T04:57:59+5:30
सोहराबुद्दीन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणातून आरोपमुक्त करण्यात आलेल्या आयपीएस अधिकाºयांच्या सुटकेला सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन शेख याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
मुंबई : सोहराबुद्दीन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणातून आरोपमुक्त करण्यात आलेल्या आयपीएस अधिकाºयांच्या सुटकेला सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन शेख याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या अपिलांवरील अंतिम सुनावणी शेवटच्या टप्प्यात आली असताना अचानक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या असाइनमेंट बदलण्यात आल्या. त्यामुळे या दोन्ही अपिलांवरील सुनावणी नव्याने घेण्यात यावी, यासाठी नुकतेच रुबाबुद्दीनच्या वकिलांनी न्या. एन. डब्ल्यू. सांब्रे यांच्यासमोर या याचिका सादर केल्या. त्यावर न्यायालयाने या याचिकांवरील पुढील सुनावणी २२ मार्च रोजी ठेवली.
यापूर्वी या अपिलांवरील सुनावणी न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्यापुढे होती. या दोन्ही अपिलांवरील अंतिम सुनावणी शेवटच्या टप्प्यात असताना उच्च न्यायालयाने न्यायाधीशांच्या असाइनमेंट बदलल्या. त्यामुळे न्या. रेवती मोहिते-डेरे यांची असाइनमेंट न्या. एन.डब्ल्यू. सांब्रे यांच्याकडे आली. नुकतेच रुबाबुद्दीनच्या वकिलांनी न्या. सांब्रे यांच्यापुढे या याचिका सादर करत सुनावणी पुन्हा नव्याने घेण्याची विनंती केली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत या अपिलांवरील सुनावणी पुढील आठवड्यात ठेवली.
दरम्यान, रुबाबुद्दीनचे वकील गौतम तिवारी यांनी या याचिकांवरील सुनावणी न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्याच पुढे घेण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयाच्या निबंधकांना अर्ज करणार नसल्याचे पत्रकारांना सांगितले. न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्यापुढे बाजू मांडली असली तरी आता नव्याने न्या. सांब्रे यांच्यापुढे आमची बाजू मांडू, असे तिवारी यांनी सांगितले. सोहराबुद्दीन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणी कनिष्ठ अधिकाºयांच्या आरोप मुक्ततेच्या आदेशाला सीबीआयने आव्हान दिले. मात्र सीबीआयने वरिष्ठ आयपीएस अधिकाºयांच्या आरोपमुक्ततेला आव्हान देणार नसल्याचे यापूर्वीच न्यायालयात स्पष्ट केले आहे.