ठाणे : बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या ठाणे महापालिकेच्या तिघा नगरसेवकांच्या जामीन अर्जावर, गुवारी होणारी सुनावणी दोन दिवसांसाठी लांबणीवर पडली आहे. ती येत्या शनिवारी होणार आहे. सरकारी वकील राजा ठाकरे हे कामात व्यग्र असल्याने, गुरुवारी सुनावणीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे ती पुढे गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.परमारप्रकरणी ८ डिसेंबर रोजी नगरसेवक सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण, नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे या चौघांनी शरणागती पत्करली. याचदरम्यान, ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर, चौघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर विक्रांत चव्हाण, नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे यांनी जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला, त्यावरील सुनावणी गुरुवारी होणार होती. सरकारी वकील उपस्थित राहू न शकल्यामुळे तपास अधिकारी आणि सहायक पोलीस आयुक्त दिलीप गोरे यांनी पुढील तारीख मिळावी, अशी विनंती न्यायाधीश व्ही. व्ही. बांबर्डे यांना केली. न्यायालयाने दोन दिवसांनी सुनावणी होईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे आणखी दोन दिवस त्या तिघांना निर्णयाची वाट पाहावी लागेल.
तिघांच्या जामिनावरील सुनावणी लांबली
By admin | Published: December 18, 2015 1:15 AM