मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. आता दोन्ही गटांनी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, तर दुसरीकडे धनुष्यबाण चिन्हासाठीही दोन्ही गटांनी दावा केला आहे. या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, आज सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी पक्षप्रमुखपदासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्ह शिवसेनेच्या ठाकरे गटाचा की, शिंदे गटाचा यावरून निवडणूक आयोगासमोर (Election Commission) सुनावणी सुरू झाली आहे. सुनावणीवेळी कपिल सिब्बल म्हणाले, 'घटनेनुसार शिंदे गटाची प्रतिनिधी सभा नाही, राष्ट्रीय कार्यकारणीला मुदवाढ द्या अथवा निवडणूक घ्या, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली आहे.
यावेळी कपिल सिब्बल यांनी विधीमंडळ आणि राजकीय पक्षाची तुलना केली. विधीमंडळ पक्षातील संख्याबळाची निवडणूक आयोगासमोर माहिती दिली. घटनेनुसार प्रतिनिधी सभा आमच्याकडेच आहे, असा युक्तिवादही कपिल सिब्बल यांनी केला आहे.
सुरुवातीला ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी आयोगासमोर युक्तिवाद केला. कपिल सिब्बल म्हणाले, शिवसेनेतील फूट कपोकल्पित आहे. शिंदे गट हे वास्तव नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी शिवसेना आहे. शिवसेनेत फूट झालेली नाही. जे आमदार बाहेर पडले आहेत ते त्यांच्या इच्छेने बाहेर पडले आहेत. पक्षातून बाहेर पडले ते वेगळ्या गटाचे आहेत. शिंदे गट हा शिवसेना नाही. शिवसेना फुटीचा पक्षावर कोणताही परिणाम झालेला नाही. ही फूट ग्राह्य धरु नये. ती काल्पनिक असू शकते. कपिल सिब्बल यांनी पक्षाची घटना वाचायला सुरुवात केली.
दोन्ही ठिकाणी आमचे संख्याबळ जास्त आहे. शिवसेनेत आतापर्यंत झालेली कार्यवाही ही प्रतिनिधी सभेनुसारच झाली आहे. प्रतिनिधी सभा पक्ष चालवत असते, असंही कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.