मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्र खरेदी आणि संगणकीकृत आरक्षण व्यवस्थेच्या निविदा प्रक्रियेतील कथित घोटाळ्याची लोकायुक्तांकडे सुनावणी होणार आहे. दि. २ सप्टेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने या प्रकरणाची सुनावणी करण्यात येणार आहे. यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्र खरेदी आणि संगणकीकृत आरक्षण व्यवस्थेच्या निविदा प्रक्रियेत २५० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केला होता. यासंदर्भात कोटेचा यांनी थेट परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. तसेच या प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीचे निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिले होते. राज्यपालांच्या आदेशानुसार या तक्रारीची दखल घेत प्रभारी लोकायुक्तांनी या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू केली. याप्रकरणी आता २ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता ऑनलाईन पद्धतीने सुनावणी घेण्यात येणार असून, राज्याच्या मुख्य सचिवांनाही याबाबत कळविण्यात आले आहे.
स्वतःच्या मर्जीतील गुजरातमधील एका विशिष्ट कंपनीला कंत्राट देण्याच्या उद्देशाने परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी निविदा प्रक्रियेतील अटींमध्ये बदल केल्याचा आरोप आमदार कोटेचा यांनी जून महिन्यात जाहीर पत्रकार परिषदेत केला होता. या बदललेल्या अटींनुसार निविदा मंजूर झाल्यास परिवहन महामंडळाला विनाकारण २५० कोटींचा भुर्दंड बसणार असल्याचेही कोटेचा यांनी म्हटले होते.