मुंबई पालिका निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 06:47 IST2025-02-25T06:47:33+5:302025-02-25T06:47:50+5:30
महाविकास आघाडीचे सरकार असताना पालिकेच्या प्रभागांची संख्या २२८ वरून ३३६ करण्यात आली. महायुतीचे सरकार आल्यानंतर प्रभागांची संख्या पुन्हा २२७ करण्यात आली.

मुंबई पालिका निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिका निवडणुकीसंदर्भात आज, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला तर मुंबई महापालिकेची निवडणूक मेअखेर होणार की पावसाळ्यानंतर, याची उत्सुकता आहे. न्यायालयाने निवडणुकीसाठी कायमर्यादा घालून दिल्यास निवडणूक आयोगाला त्यानुसार कार्यवाही करावी लागेल.
मुंबई महापालिकेची प्रभागरचना हा महत्त्वाचा मुद्दा आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार असताना पालिकेच्या प्रभागांची संख्या २२८ वरून ३३६ करण्यात आली. शिवसेनेला फायदा व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचा आक्षेप तेव्हा विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपने घेतला होता. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार आल्यानंतर प्रभागांची संख्या पुन्हा २२७ करण्यात आली. त्यास उद्धवसेनेने आक्षेप घेत उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, न्यायालयाने २२७ हीच संख्या कायम ठेवल्याने उद्धवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.
याच मुद्द्यावर आणखी काही याचिका दाखल झाल्याने सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी सुरू आहे. त्यामुळे आज होणारी सुनावणी लक्षेवधी आहे.