- पूजा दामले, मुंबईजीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमुळे मूत्रपिंड विकारांचे प्रमाण वाढत आहे. त्यात मूत्रपिंडदानाच्या प्रमाणात म्हणावी तेवढी वाढ झालेली दिसून येत नाही. देशात वर्षाला फक्त ३०० तर मुंबईत सुमारे ६५ ते ७० मृत व्यक्तींकडून मूत्रपिंडदान होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ‘मरावे परि अवयव रूपि उरावे’ या उक्तीची जनजागृती करण्यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था प्रयत्नशील आहेत. परंतु अजूनही रुग्णांचे प्रमाण आणि अवयवदानाचे प्रमाण व्यस्तच आहे. देशात दरवर्षी सुमारे साडेतीन लाख रुग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. पण केवळ ६ हजार प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतात. २०१४ आणि २०१५ या दोन वर्षांत मृत व्यक्तींच्या अवयवदानामुळे ३०० व्यक्तींना मूत्रपिंड प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे, अशी माहिती नॅशनल आॅर्गन अॅण्ड टिश्यू ट्रान्सप्लाण्ट आॅर्गनायझेशनच्या संकेतस्थळाचे मुख्य सल्लागार डॉ. संजय अग्रवाल यांनी दिली. दिल्लीत (एनसीआर रिजन) मूत्रपिंड प्रत्यारोपण होण्याचे प्रमाण अधिक आहे. देशातील एकूण मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांपैकी २५ टक्के शस्त्रक्रिया या एनसीआरमध्ये होतात. तर तामिळनाडू येथे मृत व्यक्तींनी केलेल्या अवयवदानातून सर्वाधिक प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतात, असे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले. मूत्रपिंड दिन संकल्पनाजागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त मूत्रपिंडाचे आजार, उपचार याविषयी जनजागृती करण्यात येते. यंदाची संकल्पना ‘लहान मुलांना होणारे मूत्रपिंडांचे आजार, उपचार’ अशी आहे. मूत्रपिंडाच्या आजाराचे लवकर निदान झाल्यास योग्य उपचार आणि समतोल जीवनशैलीमुळे आजार बळावण्यापासून रोखता येऊ शकतो. मूत्रपिंड अधिक निकामी होण्यापासून वाचवता येऊ शकते.मूत्रपिंडाचे कार्य मानवी शरीरात २ मूत्रपिंडे असतात. रक्तातील अनावश्यक घटक गाळण्याची क्रिया मूत्रपिंड करीत असते. मूत्रपिंड हा अवयव गाळण प्रक्रियेचे काम करतो. जन्मापासून वयाच्या ३० वर्षांपर्यंत मूत्रपिंडाचे कार्य हे सामान्यपणे चालू असते. नैसर्गिकरीत्या वयोमानाप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे केस पांढरे होतात त्याचप्रमाणे मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होत जाते. वयाच्या तिशीनंतर प्रत्येक १० वर्षांनी मूत्रपिंडाची कार्यक्षमता ही हळूहळू कमी होत जाते. मूत्रपिंडाचा आजार कोणाला होऊ शकतो?मधुमेह, उच्च रक्तदाब, रक्ताच्या नातेवाइकांना मूत्रपिंडाचा आजार असल्यास, अति दारूचे सेवन केल्यास, मूतखड्याची शस्त्रक्रिया झाल्यावर / उपचारानंतर खडा पडल्यावर काळजी न घेतल्यास मूत्रपिंडाचे आजार टाळण्यासाठी हे करा...दिवसभरात २ ते ३ लीटर पाणी प्यावे, रोजच्या रोज व्यायाम करणे, जास्त वजन वाढू देऊ नये, नियमित तपासणी करणे आवश्यक, जीवनशैलीमध्ये सुधारणा करा, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी नियमितपणे प्रोटीनची तपासणी करावी, डोळ्यांची तपासणी करावी, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी प्रत्येक सहा महिन्यांनी तपासण्या करून घ्याव्यात, अॅलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी अशी कोणत्याही प्रकारची औषधे ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.राज्यातील मूत्रपिंडदानाचे प्रमाण२०१४जिवंत व्यक्तींनी दान केलेले मूत्रपिंड - ६७४ मृत व्यक्तींनी दान केलेले मूत्रपिंड - ८०२०१५जिवंत व्यक्तींनी दान केलेले मूत्रपिंड - ४९९ मृत व्यक्तींनी दान केलेले मूत्रपिंड - ६१मूत्रपिंडाची कार्यक्षमता किती? भारतीयांच्या शरीररचनेप्रमाणे मूत्रपिंडाच्या गाळण प्रक्रियेची (कार्य) क्षमता ही ९० ते ११० मिली / प्रति मिनिट इतकी आहे.तिशीनंतर प्रत्येक १० वर्षांनी म्हणजेच १० मिली / प्रति मिनिट गाळण करण्याची क्षमता कमी होत जाते.राज्यात १४०० नेफ्रॉलॉजिस्ट राज्यात १ हजार ४०० नेफ्रॉलॉजिस्ट आहेत. तसेच नेफ्रॉलॉजी टेक्निशियनचीही कमतरता आहे. त्यामुळे डायलेसिसची सुविधा सुधारण्यासाठी टेक्निशियनची आवश्यकता आहे. म्हणून सरकारतर्फे नेफ्रॉलॉजी टेक्निशियनचे प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केले आहेत. 3333 व्यक्ती मुंबईत सध्या मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादीत आहेत. मृत व्यक्तींनी केलेल्या दानामुळे मुंबईत फक्त ६५ ते ७० प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीकडून मिळाली आहे, तर राज्यात २०१४ मध्ये फक्त ७५४ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. रुग्णांची संख्या यापेक्षा अधिक आहे. मूत्रपिंडाचे आजार वाढत असल्यामुळे मूत्रपिंडदानाविषयी अधिक जनजागृती व्हायला हवी आणि आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.२६ जिल्ह्यांत १०३ डायलेसिस मशिन राज्यात मूत्रपिंड विकार असणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. मूत्रपिंडाचा आजार बळावल्यास रुग्णांना डायलेसिस करण्याशिवाय पर्याय नसतो. काही रुग्णांना आठवड्यातून एकदा किंवा दोनदा डायलेसिस करावे लागते. त्यामुळे डायलेसिस मशिनची आवश्यकता असते.मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर १०३ डायलेसिस मशिनची साहाय्यता करणार आहे. या मशिन २६ जिल्ह्यांत बसवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. डायलेसिस सेंटरची होणार तपासणी - दीपक सावंतमूत्रपिंड निकामी झाल्यास प्रत्यारोपण करावे लागते. पण प्रत्यारोपण करणे शक्य नसल्यास अनेक रुग्णांना डायलेसिस करण्याशिवाय पर्याय नसतो. राज्यात डायलेसिस घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. डायलेसिस सेंटरची तपासणी करणारी यंत्रणा पुढच्या काळात सुरू करणार असल्याचे मत सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मांडले. राज्यात ३१ जिल्ह्यांत डायलेसिसची सुविधा उपलब्ध आहे. अजून जास्त ठिकाणी ही डायलेसिसची सुविधा सुरू करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डायलेसिससाठी येणारा खर्च कमी करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीमध्ये डायलेसिस सेंटर चालवण्यात येत आहेत. पण या डायलेसिस सेंटरमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी नियमावली तयार करण्यात येत आहे.यामध्ये डायलेसिस सेंटर कसे असावे, डायलेसिस करण्यासाठी कोणत्या गोष्टींचे पालन करावे, याविषयी नियम असणार आहेत. याचबरोबर डायलेसिस सेंटरचे कामकाज योग्य पद्धतीने सुरू आहे की नाही, हे पाहण्यासाठी यंत्रणा असणे आवश्यक आहे, असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. राज्यात ११५ डायलेसिस मशिन असून ३१ जिल्ह्यांमध्ये डायलेसिसची सुविधा उपलब्ध आहे.दरवर्षी दीड लाख डायलेसिस राज्यात केली जातात.
मूत्रपिंडदानाबाबत हात आखडताच
By admin | Published: February 12, 2016 3:27 AM