मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्याची सुनावणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 02:12 AM2018-11-03T02:12:43+5:302018-11-03T14:48:38+5:30
मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाच्या खटल्याच्या सुनावणीला शुक्रवारपासून सुरुवात झाली. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि अन्य पाच जणांवर हा खटला चालणार आहे.
मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाच्या खटल्याच्या सुनावणीला शुक्रवारपासून सुरुवात झाली. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि अन्य पाच जणांवर हा खटला चालणार आहे. बॉम्बस्फोटाच्या तब्बल दहा वर्षांनंतर हा खटला सुरू झाला आहे.
राष्ट्रीय तपास पथक (एनआयने) २८६ साक्षीदारांच्या नावांची यादी विशेष न्यायालयात सादर केली. यामध्ये पीडित, डॉक्टर, पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञांचा समावेश आहे, त्यांनी केलेल्या आरोपांचे समर्थन करण्यासाठी २०० कागदपत्रे सादर केली आहेत. न्यायालयाने पुढील सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.
३० आॅक्टोबर रोजी विशेष एनआयए न्यायालयाने सातही आरोपींवर आरोप निश्चित केले. दहशतवाद पसरविणे, बॉम्बस्फोटाचा कट रचणे, हत्या करणे, हत्येचा कट रचणे आणि अन्य काही आरोप ठेवले. आरोपींवर बेकायदा हालचाली (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) आणि भारतीय दंडसंहितेअंतर्गत (आयपीसी) खटला चालणार आहे. आरोपींवर यूएपीए, शस्त्रास्त्र कायदा, एक्सप्लोसिव्ह सबस्टान्स अॅक्ट आणि आयपीसीअंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, अजय राहीरकर, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चतुर्वेदी हे आरोपी आहेत.