मुंबई- रायगड जिल्हयातील उरण, पनवेल, पेण तालुक्यातील महामुंबई सेझसाठी संपादीत करण्यात आलेल्या जमिनी शेतक-यांना परत करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू असलेली सुनावणी तीन महिन्यात पुर्ण करण्यात येतील, अशी घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली.
महामुंबई सेझ कंपनीसाठी उरण पेण, पनवेल तालुक्यातील १५०४ हेक्टर जमिन शासनाने संपादीत केली होती. प्रत्यक्ष प्रकल्प न झाल्याने सदरची जमिन शेतक-यांना परत करण्यात यावी अशी मागणी शेतक-यांकडून करण्यात येत आहे. मात्र त्याला विलंब होत असल्याकडे लक्ष वेधत आमदार ॲड आशिष शेलार यांनी शासन सदर जमिनी परत करण्यास का विलंब करीत आहे असा प्रश्न त्यांनी विचारला.
त्यावर उत्तर देताना उद्योग मंत्र्यांनी सांगितले की, याबाबत जिल्हाधिका-यांकडे सुनावणी सुरू असून लवकरात लवकर ही कार्यवाही पुर्ण करण्यात येईल. त्यावर ही सुनावणी कधी पुर्ण होणार असा प्रश्न आमदार ॲड आशिष शेलार यांनी केला त्यावर उत्तर देताना उद्योग मंत्र्यांनी तीन महिन्यात सुनावणी पुर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. या चर्चेत सहभागी होताना आमदार महेश बादली यांनी याबाबत स्थानिक लोकप्रतिनींची बैठक घ्यावी अशी मागणीही केली.