परांजपे बंधूंच्या जामीन अर्जावर १६ जुलैला सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:07 AM2021-07-07T04:07:31+5:302021-07-07T04:07:31+5:30
भूखंड घोटाळा प्रकरण : फिर्यादींनी वेळ वाढवून मागितली लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पुण्यातील विकासक परांजपे बंधू यांनी अटकपूर्व ...
भूखंड घोटाळा प्रकरण : फिर्यादींनी वेळ वाढवून मागितली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुण्यातील विकासक परांजपे बंधू यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती. त्यावर दिंडोशी कोर्टात मंगळवारी सुनावणी होणार होती. मात्र फिर्यादीच्या वकिलांना कोर्टात काही कागदपत्रे सादर करायची असल्याने त्यांनी कोर्टाकडे वेळ वाढवून मागितली. त्यानुसार या अर्जावर आता १६ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत कोर्टाने आरोपींना अटकेपासून दिलासा दिल्याचे त्यांचे वकील निरंजन मुंदरगी यांनी सांगितले.
दिंडोशी सत्र न्यायालयात मंगळवारी फिर्यादी डोंगरे यांचे वकील जगदीश शिंगाडे आणि त्यांची मुलगी गायत्री डोंगरे या उपस्थित होत्या. परांजपे यांच्या अर्जावर सुनावणीआधीच डोंगरे यांच्या वकिलाने काही कागदपत्रे कोर्टात दाखल करण्यासाठी वेळ मागितली. त्यानुसार त्यांना १६ जुलै २०२१ पर्यंतचा कालावधी सबमिशनसाठी देण्यात आला. विलेपार्लेच्या एअरपोर्ट कॉलनीतील भूखंड अनधिकृतपणे वाढवून घेतल्याचा आरोप परांजपे बिल्डर आणि जयविजय सोसायटीच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांविरोधात वसुंधरा डोंगरे (७०) यांनी केला आहे. त्यानुसार विलेपार्ले पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत श्रीकांत परांजपे आणि शशांक परांजपे यांना पुण्यातून ताब्यात घेत चौकशीसाठी आणले होते. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी त्यांचे वकील ॲड. सुबोध देसाई आणि ॲड. निरंजन मुंदरगी यांनी २ जुलै २०२१ रोजी कोर्टात अर्ज दाखल केला आहे.