परांजपे बिल्डरच्या जमीनअर्जावर आज सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:07 AM2021-07-07T04:07:28+5:302021-07-07T04:07:28+5:30
विलेपार्ले भूखंड फसवणूक प्रकरण : पोलिसांकडून सुरू आहे चौकशी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विलेपार्लेच्या एअरपोर्ट कॉलनीतील भूखंड अनधिकृतपणे ...
विलेपार्ले भूखंड फसवणूक प्रकरण : पोलिसांकडून सुरू आहे चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विलेपार्लेच्या एअरपोर्ट कॉलनीतील भूखंड अनधिकृतपणे वाढवून घेतल्याचा आरोप परांजपे बिल्डर आणि जयविजय सोसायटीच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांविरोधात वसुंधरा डोंगरे (७०) यांनी केला. त्यानुसार परांजपे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
विलेपार्ले पूर्वच्या पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील सहार जंक्शनजवळ डोंगरे यांच्या मालकीचे भूखंड क्रमांक १२६ (अ) (ब) आणि (क) हे १९७१ साली जयविजय सोसायटीला भाडेतत्त्वावर देण्यात आले. तर १२६ (ड) हा कायमस्वरूपी विकण्यात आला ज्याच्या दस्तावर सहमालक डोंगरे यांनी सही केली. १९९६ मध्ये भूखंड क्रमांक १२६ (अ) (ब) (क) हे जयविजय सोसायटीने परांजपे कुटुंबाकडून खरेदी केले, मात्र त्याची कल्पना डोंगरेना देण्यात आली नाही. डोंगरेचे वडील मोरेश्वर उर्फ बाबुराव परांजपे आणि काका भालचंद्र विष्णू परांजपे यांचे निधन झाल्याने आजोबांच्या जमिनीसंदर्भात सर्व व्यवहार त्यांचे काका पुरुषोत्तम परांजपे, सख्खा भाऊ जयंत परांजपे, चुलत भाऊ श्रीकांत, शशांक, माधव, वसंत व हेमंत पाहत होते. परांजपे हिंदू अविभक्त कुटुंबाने जयविजय सोसायटीला भूखंड क्रमांक (अ) (ब) (क) दिले होते. त्याची १९९६ साली विक्री झाल्यानंतर जयविजय सोसायटीतर्फे सादर करण्यात आलेल्या दस्तात खाडाखोड आढळली. एकत्रीकरण नकाशाप्रमाणे १२६ (क) च्या पश्चिमेस ५२० चौरस किलोमीटरचा (३० फुटाअंतर्गत खासगी) रस्ता डोंगरेनी विकला नव्हता. तो हडप करण्यासाठी नोंदणी केलेल्या मूळ बदर १/१२०४/१९९६ दस्तातील रस्त्यांची नोंद काढून बनावट शिक्के मारण्यात आले व त्यांची परवानगी न घेता कागदपत्रे मूळ दस्तामध्ये जोडून जयविजय सोसायटीचे नाव मालमत्ता पत्रकात चढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपींनी ५२० चौरस मीटरचा रस्ता स्वतःच्या मालकीचा करत डोंगरे व शासनाची फसवणूक केली. त्यानुसार श्रीकांत परांजपे, शशांक परांजपे, जयंत परांजपे, माधव परांजपे, जयविजय सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष राघवेंद्र पाटील, सचिव आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी असल्याचे डोंगरे यांनी २४ जुलै, २०२१ रोजी विलेपार्ले पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
'आम्ही परांजपे बिल्डरविरोधात जे आरोप केले आहेत, त्याबाबत आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत. त्यामुळे त्यांनी जे काही गुन्हे केले आहेत ते लवकरच सर्वांच्या समोर येतील'.
- वसुंधरा डोंगरे, तक्रारदार