Join us

एसएससी परीक्षा रद्दच्या याचिकेवर आज सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:07 AM

याचिकेवर आज सुनावणीएसएससी परीक्षा रद्दच्या याचिकेवर आज सुनावणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहावीच्या परीक्षा केव्हा घेणार? ...

याचिकेवर आज सुनावणी

एसएससी परीक्षा रद्दच्या याचिकेवर आज सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहावीच्या परीक्षा केव्हा घेणार? १६ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून असताना या प्रकरणात न्यायालयात महाअधिवक्ता का उपस्थित राहात नाहीत? असे सवाल करत उच्च न्यायालयाने दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी गुरुवारी ठेवली आहे.

पुणेस्थित प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. बुधवारी या याचिकेवर न्या. एस. जे. काथावाला व न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. या याचिकेवरील सुनावणीत सरकारी वकिलांच्या इंटरनेटची समस्या निर्माण झाल्याने खंडपीठाला त्यांच्या प्रशांची उत्तरे मिळू शकली नाहीत. दरम्यान, सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले.

‘तुम्ही (राज्य सरकार) दहावीची परीक्षा केव्हा घेणार? १६ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असताना महाअधिवक्ते न्यायालयात का उपस्थित राहत नाहीत?’ असे सवाल न्यायालयाने केले; तसेच इंटरनेटच्या समस्येमुळे याचिकेवरील पुढील सुनावणी गुरुवारी ठेवली.

दरम्यान, ही याचिका अवेळी दाखल करण्यात आली असून ती दाखल करून घेण्यायोग्य नसल्याचे सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सरकारने आपल्या अधिकारांचा वापर करून एसएससी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने परीक्षा घेतल्या तर विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घातले जाईल. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे सूत्रही अद्याप ठरलेले नाही, असे सरकारने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आधी सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ राज्य सरकार व आयसीएसई बोर्डाने निर्णय घेतला. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे यंदा १६ लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणार होते. आधी दहावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या त्यानंतर त्या रद्द करण्यात आल्या. तसेच शिक्षणमंत्र्यांनी अकरावीसाठी प्रवेश देताना सीईटी घेणार असल्याचे जाहीर केले. सरकारच्या या निर्णयाला कुलकर्णी यांनी आव्हान दिले.

राज्य सरकार जर १२ वीच्या १४ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणार असले आणि अकरावीसाठी सीईटी घेणार असेल तर दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या १६ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे शक्य का नाही? एसएससी, सीबीएसई आणि आयसीएसई अशा वेगवेगळ्या बोर्डांनी दहावीचे निकाल वेगवेगळ्या फॉर्म्युलाने लावले तर आणखी गोंधळ वाढेल. एकंदरीत शैक्षणिक क्षेत्रातच गोंधळ उडेल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेऊन सरकारच्या या निर्णयात उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

....................................