Join us

रमेश कदमच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

By admin | Published: August 17, 2015 1:08 AM

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सोलापूर जिल्ह्यातील आमदार

मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सोलापूर जिल्ह्यातील आमदार रमेश कदम याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर येथील विशेष सत्र न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. ‘लोकमत’ने उघड केलेल्या या घोटाळ्याप्रकरणी १८ जुलै रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून गेले ३० दिवस कदम फरार आहे. सीआयडी आणि राज्य पोलीस त्याच्या मागावर असले तरी तो गुंगारा देत फिरत आहे. आता उद्या त्याला अटकपूर्व जामीन मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे.साठे महामंडळाचे १४२ कोटी रुपये स्वत: अध्यक्ष असलेल्या तीन संस्थांना कदम याने महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात दिले. पेडर रोड या मुंबईतील अलिशान वस्तीत कोट्यवधींचा भूखंड खरेदी केला. सहा जिल्ह्यांमध्ये महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी आरटीजीएस आणि बेअरर चेकने काढलेली ८६ कोटी रुपयांची रक्कम बेपत्ता आहे. महामंडळाच्या पैशातून ६० महागड्या गाड्या नेते, सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या ३८ विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ५ कोटी रु.या प्रमाणे १९० कोटी रुपयांची खिरापत विधानसभा निवडणुकीच्या तीन महिने आधी वाटण्यात आली. असे अनेक धक्कादायक घोटाळे महामंडळात झाले. या प्रकरणी आतापर्यंत कदमच्या दोन बहिणी आणि एका पीएसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)