Join us

इंदौरहून आणले १६ वर्षीय मुलीसाठी हृदय

By admin | Published: January 04, 2016 2:35 AM

मध्यप्रदेशातील इंदौरहून हृदय मुंबईतील एका मुलीच्या मदतीला धावून आले आहे. या वेळेस मुंबईतील हृदयरोगतज्ज्ञ इंदौर येथे जाऊन त्यांनी हे हृदय अवघ्या १ तास ५७ मिनिटांत ५४६ किमीचा प्रवास करून मुंबईत आणले.

मुंबई : मध्यप्रदेशातील इंदौरहून हृदय मुंबईतील एका मुलीच्या मदतीला धावून आले आहे. या वेळेस मुंबईतील हृदयरोगतज्ज्ञ इंदौर येथे जाऊन त्यांनी हे हृदय अवघ्या १ तास ५७ मिनिटांत ५४६ किमीचा प्रवास करून मुंबईत आणले. ज्या मुलीवर त्याचे प्रत्यारोपण करण्यात आले, ती शस्त्रक्रियादेखील यशस्वी झाली आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच विक्रोळी येथील १६ वर्षीय मुलीला या हृदयाची अमूल्य अशी भेट मिळाली आहे. इंदौर येथील एमजीएम रुग्णालयात २० वर्षे वयाच्या तरुणीवर उपचार सुरु होते. तिच्या डोक्याला जबर मार बसला होता. रविवार, ३ जानेवारी रोजी सकाळी या तरुणीला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केले. त्यानंतर डॉक्टर आणि स्वयंसेवी संस्थेने मिळून तिच्या पालकांशी संवाद साधला. त्या वेळेस तिच्या पालकांनी तिचे हृदय आणि यकृत दान करण्यास संमती दर्शवली. तत्काळ इंदौरच्या आरोग्य विभागाशी चर्चा करण्यात आली. तातडीने सर्व परवानग्या मिळाल्या आणि पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली. ब्रेन डेड झालेल्या २० वर्षीय तरुणीचे हृदय मुंबईत आणण्यात आले, तर यकृत दिल्लीत नेण्यात आले. ‘१८ वर्षांखालील मुलांवर शस्त्रक्रिया करताना ही गुंतागुंत असते. त्यासाठी आम्ही एक विशिष्ट प्रक्रिया वापरतो. दात्याचे हृदय काही वेळ ‘रेस्ट’साठी ठेवले जाते. त्यानंतर त्या हृदयाचे प्रत्यारोपण केले जाते. त्यामुळे स्नायूंशी जुळवून घेणे, नव्या हृदयाला सोपे जाते,’ असे फोर्टिस रुग्णालयाचे पिडिएट्रिक्स कार्डिओलॉजी विभाग प्रमुख डॉ. विजय अग्रवाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.प्रत्यारोपणामुळे जनजागृतीनवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हृदय प्रत्यारोपण यशस्वी झाले ही आनंदाची बाब आहे. या प्रत्यारापेणामुळे जनजागृती होईल आणि अनेक जण पुढे येतील, अशी आशा आहे. अवयवाची गरज असलेल्या गरजूंची संख्या वाढत आहे, पण अवयवदानाचा टक्का वाढल्याने ही दरी कमी होईल. इंदौरच्या अधिकाऱ्यांकडूनही आम्हाला खूप सहकार्य मिळाले. - डॉ.सुजाता पटवर्धन, सरचिटणीस, मुंबई विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती आकाशातही ग्रीन कॉरिडोर यशस्वी एअरपोर्ट आणि ट्रॅफिक अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन इंदौर ते मुंबई अवकाश मार्गावर ग्रीन कॉरिडोर यशस्वी केला. मुंबईत एअरपोर्टच्या गेट क्रमांक आठपासून ते फोर्टिस रुग्णालयात या मार्गावर ग्रीन कॉरिडोर करण्यात आला होता.