लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : संकटात सापडलेल्यांना मदतीचा हात देणे, त्यांचे संरक्षण करणे - वयाम रक्षाम: - हे भारतीय तटरक्षक दलाचे ब्रीदवाक्य. या ब्रीदवाक्याला अनुसरून कार्य करण्यास तटरक्षक दल सदैव तत्पर असते. त्यात कोणताही आपपरभाव नसतो. त्याचीच प्रचिती आली एका चिनी नागरिकाला.
मुंबईपासून २०० किमी अंतरावर अरबी समुद्रात एमव्ही डोंग फांग कान टॅन नंबर २ हे चिनी जहाज संयुक्त अरब अमिरातीकडे जात होते. बुधवारी रात्री जहाजावरील क्रू मेंबरपैकी यिन वेइग्यांग या कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. प्रसंग बाका होता. जहाजावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने ही माहिती तटरक्षक दलाच्या सागरी बचाव समन्वय केंद्राला दिली. सुरुवातीला टेलिमेडिसीनद्वारे वैद्यकीय सल्ला देण्यात आला. त्यानंतर रुग्णाला हॉस्पिटलला दाखल करण्यासाठी तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर झेपावले.
अंधार आणि खराब हवामानातही तटरक्षक दलाने आपली कामगिरी चोख पार पाडत आपद्ग्रस्ताला रुग्णालयात दाखल केले.