Join us

तरुणांमध्ये वाढतोय हृदयविकार; आता लिपिड प्रोफाइल १८ व्या वर्षीच करा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2024 6:31 AM

लिपिड प्रोफाइल चाचणी करण्यासाठी आता उपाशी राहण्याची गरज नाही. 

मुंबई : गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये हृदयविकाराचे  प्रमाण  वाढीस लागले आहे.  उतारवयात जे हृदयाचे विकार होतात,  ते सध्या १८ ते ३० वयोगटांमधील तरुणांना जडत आहेत. त्यामुळे कार्डिओलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (सीएसआय)   या संस्थेने नवी मार्गदर्श तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार हृदयविकाराशी संबंधित लिपिड प्रोफाइल चाचणी १८व्या वर्षी करावी, असे सुचविले आहे. ही चाचणी करण्यासाठी आता उपाशी राहण्याची गरज नाही. 

सध्या युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वाद्वारे हृदयाची तपासणी केली जाते. मात्र, सीएसआयच्या मते,  भारतात काही विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत जी इतर देशांमध्ये आढळत नाहीत. जसे की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लिपिड आणि कमी एचडीएल लेव्हल आढळून येतात. त्यामुळे या विशिष्ट गोष्टींसाठी भारतातील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी गरजेनुसार उपचारात बदल करावे लागणार आहेत. डिस्प्लेडियाचे प्रमाण तरुणांत अधिक आहे. पूर्वी ४० ते ४५ वयोगटात ही चाचणी केली जात होती. 

काय आहेत लक्षणे?

बहुतेक लोकांना डिस्प्लेडिया झाला आहे हे लक्षातच येत नाही.  पायाला सूज येणे, छातीत दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे, मान आणि पाठ दुखणे, झोप न येणे, थकवा जाणवणे, अपचन,  चक्कर येणे, घाबरल्यासारखे होणे आदी लक्षणे आढळून येतात.  

या कारणांमुळे होतो...  

व्यसनाधीनता, लठ्ठपणा, मधुमेह, अतिरिक्त तेलकट, तुपकट खाणे, अतिरिक्त  प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे, यकृताचे आजार. जंक फूड, आधुनिक जीवनशैलीचा वापरामुळे हा विकार होतो. 

आधुनिक जीवनशैलीमुळे खाण्या-पिण्याच्या सवयींपासून ते दैनंदिन आयुष्यात उशिरापर्यंत जागरण, विविध ताणतणाव ही काही प्रमुख कारणे हृदयाच्या आरोग्याला बाधा पोहोचवतात.  गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्याची चाचणीसुद्धा आता लवकर करणे गरजेचे आहे - डॉ. अजय चौरासिया, हृदयरोग विभागप्रमुख, नायर रुग्णालय 

टॅग्स :आरोग्यहृदयविकाराचा झटका