‘हार्ट ट्रान्सप्लांट’ रुग्णाची प्रकृती सुधारतेय; व्हिडीओवरून साधला नातेवाइकांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 06:17 AM2024-07-16T06:17:49+5:302024-07-16T06:18:13+5:30

रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतरचा टप्पा हा कठीण आणि महत्त्वाचा असतो. या काळात रुग्णाला कोणताही संसर्ग होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे असते.

'Heart transplant' patient's condition improving; Video communication with relatives | ‘हार्ट ट्रान्सप्लांट’ रुग्णाची प्रकृती सुधारतेय; व्हिडीओवरून साधला नातेवाइकांशी संवाद

‘हार्ट ट्रान्सप्लांट’ रुग्णाची प्रकृती सुधारतेय; व्हिडीओवरून साधला नातेवाइकांशी संवाद

मुंबई : गेल्या आठवड्यात महापालिकेच्या केईएम रुग्णालयात ६० वर्षांत प्रथमच हृदय प्रत्यारोपणाची क्लिष्ट शस्त्रक्रिया झाली. छत्रपती संभाजीनगरच्या ३८ वर्षीय रुग्णावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली, त्याची तब्बेत आता सुधारत आहे. रुग्णाला व्हेंटिलेटरवरून काढले असून, त्याने रिकव्हरी रूममधूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नातेवाइकांशी संवाद साधला  आहे.  रुग्णाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, म्हणून रुग्णालय विशेष काळजी घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतरचा टप्पा हा कठीण आणि महत्त्वाचा असतो. या काळात रुग्णाला कोणताही संसर्ग होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे असते. कारण जो अवयव रुग्णामध्ये बसविण्यात आला आहे, त्याला कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही म्हणून डॉक्टर अधिक सतर्क असतात. रुग्णाला ज्या खोलीत ठेवण्यात आले आहे, तेथे बाहेरील कोणत्याही व्यक्तीचा वावर होणार नाही, याची काळजी घेतली जाते. या रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर आणि परिचारिकासुद्धा विशेष काळजी घेत असतात. रुग्णाला कोणताही संसर्ग होणार नाही, हे प्राधान्याने पाहावे लागणार आहे.

केईएम रुग्णालयामध्ये १९६३-६४ मध्ये पहिल्यांदा हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दुर्दैवाने ती यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे त्यानंतरची अनेक दशके प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करता आल्या नाहीत. त्यानंतर आता प्रथमच ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी दोन यकृत (लिव्हर) प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ते दोन्ही रुग्ण व्यवस्थित असल्याची माहिती केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली.

अन्य अवयवांचे प्रत्यारोपण कुठे?

केईएम रुग्णालयात किडनी, हात, यकृत आणि  हृदय या अवयवांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यामुळे अन्य महत्त्वाचे असणारे स्वादुपिंड, फुप्फुस आणि छोटे आतडे या अवयवाच्या शस्त्रक्रिया केईएम वगळता महापालिकेच्या कोणत्या रुग्णालयात करता येतील, याची चाचपणी महापालिका प्रशासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. सायन आणि नायर रुग्णालयात या शस्त्रक्रिया करता येईल, याबाबत विचार सुरू आहे. ही महापालिकेची दोन मोठी आणि जुनी रुग्णालये आहेत. कूपर रुग्णालय अजून विकसित होत असल्याचे सांगितले जात आहे.

इतक्या वर्षांनंतर वैद्यकीय शास्त्रात क्लिष्ट असणारी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया महापालिकेच्या रुग्णालयात झाली आहे. त्यामुळे या रुग्णाला कोणताही संसर्ग होणार नाही, याची जास्त काळजी घेत आहोत. डॉक्टर आणि परिचारिका रुग्णाच्या तब्बेतीवर लक्ष ठेवून आहोत. रुग्णाने त्याच्या नातेवाइकांशी व्हिडीओवर संवाद साधला आहे. या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांचा उत्साह वाढला आहे. महापालिकेच्या अन्य रुग्णालयांत कोणत्या अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करता येईल, त्याची चाचपणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.  

- डॉ. सुधाकर शिंदे,

अतिरिक्त महापालिका आयुक्त, आरोग्य

Web Title: 'Heart transplant' patient's condition improving; Video communication with relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई