हार्ट टचिंग... केईएममध्ये हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी यशस्वी; ६० वर्षांनंतर सार्वजनिक रुग्णालयातील पहिली शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 07:04 AM2024-07-13T07:04:43+5:302024-07-13T07:05:55+5:30
केईएममध्ये ६० वर्षांत प्रथमच हृदय प्रत्यारोपणाची क्लिष्ट शस्त्रक्रिया झाली.
मुंबई : हृदय प्रत्यारोपणासारखी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात गुरुवारी यशस्वीरीत्या पार पडली. त्यासाठी तब्बल ४९ डॉक्टर, दहा परिचारिका आणि नऊ तंत्रज्ञ यांनी अथक प्रयत्न केले. केईएममध्ये ६० वर्षांत प्रथमच हृदय प्रत्यारोपणाची क्लिष्ट शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या ३८ वर्षीय रुग्णाला नवे जीवन लाभले. याच शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयांत ३५ ते ४० लाख रुपये खर्च येतो. मात्र, केईएममध्ये त्यासाठी अवघा आठ लाख रुपये खर्च आला.
छत्रपती संभाजीनगर येथील ३८ वर्षांच्या पुरुषाला हृदयविकाराचा त्रास होत होता. त्रास एवढा बळावला की त्याला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. या रुग्णावर केईएममध्ये उपचार सुरू होते. हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी त्याचे नाव प्रतीक्षा यादीवरही होते. उल्लेखनीय म्हणजे केईएममध्येच उपचार घेणाऱ्या सई परब या ३४ वर्षीय महिलेला मेंदूमृत घोषित करण्यात आले. तिच्या नातेवाइकांच्या संमतीनंतर हृदय आणि डोळे दान करण्यात आले. नियमानुसार ज्या रुग्णालयात मेंदूमृत अवयदान होते त्या ठिकाणी प्रतीक्षा यादीवर असलेल्या रुग्णांना प्रथम प्राधान्य दिले जाते. त्याचा लाभ ३८ वर्षीय रुग्णाला झाला.
डॉ. सुधाकर शिंदे यांचे विशेष प्रयत्न
केईएम रुग्णालयामध्ये सन १९६३-६४ मध्ये पहिल्यांदा हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दुर्दैवाने ती यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे त्यानंतरची अनेक दशके प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करता आल्या नाहीत. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त्त असलेल्या डॉ. सुधाकर शिंदे यांनी पुढाकार घेऊन या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी यासाठी प्रशासनाला तात्पुरता परवाना (प्रोव्हिजनल लायसन्स) मिळाला. त्यानंतर हृदय शस्त्रक्रियेसाठी आवश्यक उपकरणे आणि सामग्री खरेदी करण्यात आली. हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत अत्यंत अनुभवी असलेले खासगी रुग्णालयात कार्यरत असणारे डॉ. प्रवीण कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली होती.
आठ लाखांत शस्त्रक्रिया
महापालिकेने आठ लाखांचा खर्च महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री साहाय्यता निधी आणि पंतप्रधान साहाय्यता निधी याद्वारे केला.
रुग्णाला हृदय देणाऱ्या दात्याचे, त्याच्या कुटुंबीयांचे तसेच ही शस्त्रक्रिया यशस्वी करणारे हृदय शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. उदय जाधव, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, सर्व डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, समुपदेशक आणि संबंधित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे डॉ. शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन महापालिका प्रशासनातर्फे कौतुक करून आभारही मानले.
माझी बायको अवयवरूपी जिवंत
माझी बायको गरोदर असताना तिचा रक्तदाब वाढला आणि त्यात तिचे ब्रेन हॅमरेज झाले. डॉक्टरांच्या तपासणीनंतर तिचा मेंदू मृत घोषित केला. त्यानंतर डॉक्टरांनी मला समुपदेशन केल्यानंतर मी अवयवदान करण्यास संमती दिली. माझी बायको जरी या जगात नसली तरी या अवयवदानाने ती अवयवरूपी जिवंत आहे - दीपक परब, अवयवदाता सई परब यांचे पती
सार्वजनिक रुग्णालयात पाच वर्षांत पाच अवयवदान
मुंबई विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीने दिलेल्या माहितीनुसार, २०१९ ते २०२४ ( १२ जुलै) या पाच वर्षांत मुंबईतील सार्वजनिक रुग्णालयात पाच मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान करण्यात आले आहे. त्यामुळे या सार्वजनिक रुग्णालयातील मेंदूमृत रुग्णाचे अवयवदान वाढण्यासाठी आता रुग्णालय प्रशासनाला अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.